वाई : सध्या जातीपातीच्या तीव्र भावनांमुळे माणसामाणसातील, समाजातील दुरावा वाढताना जाणवत आहे. शेकडो वर्षांंपासून आपले पूर्वज सगळ्या जातीपाती घेऊन एकोप्याने राहिले. सध्याची लोकशाही शिवाजी महाराजांना अपेक्षित असणारी लोकशाही नाही. त्यामुळे समाजात दुरावा निर्माण झाल्यास देशाचे तुकडे होण्यास वेळ लागणार नाही. शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन हा हिंदुस्थानचा पहिला स्वातंत्र्य दिन असल्याची भावना खासदार उदयनराजे भोसले यांनी या वेळी व्यक्त केली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रविवारी साताऱ्यातील जलमंदिर पॅलेसच्या प्रांगणात उदयनराजे भोसले  यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

सध्या विविध समाजांत निर्माण झालेली तेढ  घातक असून शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले  हे स्वराज्य नाही, असे सांगून ते म्हणाले,की आपण फक्त शिवाजी महाराजांचे  नाव घेतो,  पण त्यांच्या विचारांची अंमलबजावणी केली जात नाही.

ते म्हणाले,की खऱ्या अर्थाने हिंदुस्थानात लोकशाही स्थापनेचा हा पहिला दिवस. वेगवेगळ्या जातीधर्मातल्या लोकांना एकत्र करून कोणताही भेदभाव न करता प्रत्येकाला आपलं समजून छत्रपती शिवाजी महाराजांनी वाटचाल केली. रयतेचा राजा म्हणून छत्रपतींची ओळख आहे. स्वराज्याचा विचार त्यांनी मार्गी लावला. पण खंत ही आहे, की जी स्वराज्याची कल्पना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात होती, जी त्यांनी अमलातही आणली, ती आता गेली कुठे? त्या काळातलं रयतेचं राज्य गेलं कुठे? तेव्हा लोकं बंधुभावाने राहात होते. त्यांच्यात तेढ कुणी निर्माण केली, असा सवाल त्यांनी केला.

आधीच वेगवेगळ्या जातीधर्मात शेजाऱ्यापाजाऱ्यात  तेढ निर्माण झाली आहे. सर्व जातीधर्मात आपले सगळ्यांचे मित्र आहेत. पण त्यामध्ये कुठेतरी दुरावा निर्माण झालेला जाणवतो. कोणत्याही विचाराला बळी न पडता एकत्र बंधुभावाने आपले पूर्वज राहात होते, तसंच आत्ताही आणि भविष्यातही राहायला हवे.  हीच शिवाजी महाराजांची लोकशाहीची कल्पना होती.