देशात महागाई आणि इंधन दरात वाढ होत असल्याने विरोधकांनी ‘अच्छे दिन’वरुन नरेंद्र मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली असतानाच मोदींचे भाऊ सोमभाई मोदी यांनी भावाची पाठराखण केली आहे. फुकटच दिलं म्हणजे अच्छे दिन येतील का? यासाठी काम करा,मेहनत करा, शिक्षण घ्या असे त्यांनी म्हटले आहे.

मोदींचे बंधू सोमभाई मोदी हे मंगळवारी आळंदी रस्त्यावरील वडमुखवाडी चऱ्होली येथील साई मंदिरात दर्शनासाठी आले होते. पत्रकारांनी अच्छे दिन आले का?, असा प्रश्न विचारताच सोमभाई म्हणाले, फुकटचं दिलं म्हणजे अच्छे दिन येतील का? यासाठी काम करा, मेहनत करा, शिक्षण घ्या यासाठी मेडिकल कॉलेज विद्यापीठ बनवलेले आहेत. महाविद्यालयात प्रवेश घेताना अडचणी होत्या त्या सोडवण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

लहान मुलांवरील अत्याचारासाठी सोमभाई मोदी यांनी पालकांना जबाबदार ठरवले. लहान मुलांवर होणारे अत्याचारासाठी पालक जबाबदार आहेत. पालकांनी मुलांवर चांगले संस्कार केले पाहिजे. जेणेकरून मोठे झाल्यानंतर ते काही चुकीचं काम करणार नाही. मुलगी बाहेर गेली तर मुलीला विचारला जात मात्र मुलांना हा प्रश्न पालक विचारत नाहीत असं देखील त्यांनी सांगितले.

दरम्यान, सोमभाई मोदी यांनी वेळोवेळी मोदी सरकारच्या कामाची स्तुती केली आहे. गुजरातमधील वाडनगर येथे राहणारे सोमभाई यांनी नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्रीपदावर असताना त्यांनी गुजरातसाठी मोलाचे कार्य केले, असे त्यांनी म्हटले होते.