कोकण, तसेच गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झालेली व मुंबई-गोवा अंतर झपाटय़ाने पार करणाऱ्या तेजस एक्स्प्रेसच्या प्रवाशांना लवकरच सुखद धक्का बसण्याची शक्यता आहे. रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयामुळे प्रवाशांना हवेत असल्याचा फिल येईल, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. हवाई सुंदरींच्या धर्तीवर प्रवाशांच्या खानपान सेवेसाठी रेल्वे मंत्रालयाने दिल्ली-आग्रा मार्गावरील गतिमान एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुंदरींची नेमणूक केली आहे. हा पॅटर्न लवकरच मुंबई ते करमाळी मार्गावर चालणाऱ्या तेजस एक्स्प्रेसमध्ये राबविला जाणार आहे. रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या निर्णयाबद्दल माहिती देताना सांगितले की, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ‘आयआरसीटीसी’ला तेजसमध्ये महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचे आदेश दिले आहेत. या रेल्वे सुंदरी हिंदी आणि इंग्रजीत प्रवाशांशी संवाद साधू शकतील. कंत्राटी तत्त्वावर या रेल्वे सुंदरींची भरती करण्यात येईल.

सध्या रेल्वे मंत्रालयाकडून आग्रा-दिल्ली मार्गावरील गतिमान एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुंदरींची नेमणूक करण्यात आली आहे. सकाळी दिल्ली ते आग्रा आणि सायंकाळी आग्रा ते दिल्ली अशा दोन फेऱ्या चालणाऱ्या गतिमान एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना खानपान पुरविण्याची जबाबदारी रेल्वे सुंदरींवर असते.गतिमान एक्स्प्रेसमधील रेल्वे सुंदरींच्या नेमणुका आयआरसीटीसीतर्फे करण्यात आल्या आहेत. एका डब्यातील प्रवाशांना वेळेत खाद्यपदार्थ पुरविण्याची जबाबदारी दोघा महिला कर्मचाऱ्यांवर असते. त्यासोबत स्वच्छतेसाठी अन्य कर्मचारीही नेमले जाते. विमानाप्रमाणेच गतिमान एक्स्प्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रवाशांचे हसतमुखाने स्वागत करून खानपान सेवा दिली जाते. आगामी काळात कोकण रेल्वेच्या प्रवाशांनाही हा अनुभव घेता येणार आहे.

प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर!

अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेली देशातील सर्वाधिक वेगवान ‘तेजस एक्स्प्रेस’चा लौकिक आहे. मुंबई-गोवा मार्गावर धावणाऱ्या या रेल्वेचा वेग ताशी २०० किलोमीटर आहे.‘तेजस एक्स्प्रेस’च्या प्रत्येक डब्याच्या निर्मितीसाठी ३.५० कोटी रुपये खर्च झाले आहेत. गाडीत अत्याधुनिक इलेक्ट्रोमॅटिक ब्रेकिंग सिस्टीम बसविण्यात आली आहे. या गतिमान गाडीत वेगवान वायफायची सुविधाही प्रवाशांना देण्यात आली आहे.