परभणीत हमीभावापेक्षा कमी दराने खरेदीचा निषेध

बाजारपेठेत कापूस, सोयाबीन, मूग, उडीद या शेतमालाची आधारभूत किमतीपेक्षा कमी भावाने खरेदी होत असल्याने शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीतील शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापसाची आधारभूत किमतीने खरेदी करावी म्हणून हा माल जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात आणून टाकला. कार्यकर्त्यांनी हा माल आणल्याने कार्यालयात मोठी धावपळ उडाली. आधारभूत किमतीपेक्षा कमी भावाने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा आग्रहही सुकाणू समितीने या वेळी धरला. जिल्हाधिकारी कक्षात शेतकरी व अधिकारी यांच्यात हा घोळ अर्धा तास चालू होता.

परभणी जिल्ह्यात साठ ते सत्तर टक्क्यांनी खरीप पिकाचे उत्पादन घटले आहे. बाजारपेठेत खरीप पिकाच्या शेतमालाला आधारभूत किमतीने भाव मिळत नाही. शासनाच्या खरेदी केंद्रावर ऑनलाइन किंवा निकषात बसत नाही म्हणून सोयाबीन खरेदी करण्यास नकार दिला जातो. सोयाबीनची आधारभूत किंमत ३ हजार ५० रुपये आहे. त्यावर २०० रुपये बोनस गृहीत धरला तर ही किंमत ३ हजार २५० रुपये होते. व्यापारी शेतकऱ्याकडून सध्या सोयाबीन १ हजार ६०० ते २ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल खरेदी करीत आहेत. हीच परिस्थिती कापूस, मूग, उडीद आदी पिकाच्या बाबतीत आहे. आधारभूत किमतीपेक्षा कमी भावाने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश आहेत. परंतु जिल्ह्यात कुठेही असे गुन्हे दाखल झाले नाहीत. परभणी येथील शासकीय खरेदी केंद्रावर आजपर्यंत केवळ ९ क्विंटल सोयाबीन खरेदी झाले आहे.

बाजारपेठेत कोणत्याही शेतीमालाला आधारभूत किंमत मिळत नाही म्हणून संतप्त शेतकऱ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात सोयाबीन व कापूस जिल्हाधिकारी कार्यालयात विक्रीसाठी आणले. जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्या कक्षात सोयाबीन व कापूस टाकण्यात आला. या वेळी जिल्हाधिकारी कक्षात उपस्थित नव्हते. इतर अधिकाऱ्यांकडे सुकाणू समितीचे कॉ. विलास बाबर यांनी आपले गाऱ्हाणे मांडताना बाजारपेठेत शेतमालाला आधारभूत किंमत मिळत नाही. आपण आधारभूत किमतीने हा माल खरेदी करावा, असा आग्रह धरला. कर्जमाफीमुळे बँका दारावर उभे करत नाहीत, शेतकऱ्यांना बाजारात उधारीवर माल मिळत नाही, सध्या व्यापारी कवडीमोल भावाने सोयाबीन, कापसाची खरेदी करत आहेत. अशा व्यापाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.

दुपारी चार वाजता निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्या कक्षात शेतकरी संघटनांची सुकाणू समिती, बाजार समिती व सहकार खात्याचे अधिकारी यांच्यात बठक झाली. या बठकीत व्यापाऱ्यांनी चांगला माल आधारभूत किमतीवर खरेदी करावा यावर त्रिसदस्यीय समिती लक्ष ठेवेल तसेच आधारभूत किमतीवर खरेदी झालेल्या मालाची नोंद ठेवली जाईल, कच्च्या पावत्या देणाऱ्या व्यापाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याच्याही सूचना या वेळी देण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या या आंदोलनात कॉ. बाबरसह अनंत कदम, माउली कदम, मोहन कुलकर्णी, मुंजाभाऊ कदम, नारायणराव अवचार, रोहिदास हारकळ, कॉ. अशोक कांबळे, भारत पवार, भीमराव मोगले, उद्धवराव ढगे, शेख चाँद शेख फरीद, कैलास थावरे, तुकाराम धुमाळ आदी मोठय़ा संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.