05 June 2020

News Flash

दहावी, बारावीसाठी खेळाडूंना आता सरसकट गुण

राज्यातील दहावी, बारावीच्या निकालाचा फुगवटा पुढील वर्षी आणखी वाढण्याची शक्यता आहे. खेळाडूंना उत्तीर्ण होण्यापुरतेच वाढीव गुण देण्याचा निर्णय बदलून या वर्षांपासून खेळाडूंना सरसकट १५ ते

| June 10, 2015 02:55 am

राज्यातील दहावी, बारावीच्या निकालाचा फुगवटा पुढील वर्षी आणखी वाढण्याची शक्यता आहे. खेळाडूंना उत्तीर्ण होण्यापुरतेच वाढीव गुण देण्याचा निर्णय बदलून या वर्षांपासून खेळाडूंना सरसकट १५ ते २५ गुण वाढवून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

राज्य, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना उत्तीर्ण होण्यापुरतेच वाढीव गुण देण्याचा निर्णय शासनाने चार वर्षांपूर्वी घेतला होता. त्याबाबत ३० नोव्हेंबर २०११ला शासन आदेशही जाहीर करण्यात आला. हा निर्णय बदलण्याची मागणी सातत्याने केली जात होती. त्या पाश्र्वभूमीवर खेळाडू विद्यार्थ्यांना सरसकट गुण देण्याची शिफारस क्रीडा विभागाकडून करण्यात आली होती. ती शिफारस मान्य करून फक्त उत्तीर्ण होण्यापुरतेच गुण देण्याचा निर्णय शासनाने बदलला आहे. आता खेळाडूंना सरसकट वाढीव गुण देण्यात येणार आहेत. या वर्षी म्हणजेच मार्च २०१६ मध्ये परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना नव्या नियमाचा लाभ होणार आहे. त्यामुळे पुढील वर्षांचा दहावीचा निकालही नवा विक्रम करण्याची शक्यता आहे.

भारतीय शालेय खेळ महासंघ, भारतीय क्रीडा प्राधिकरण, केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाने पुरस्कृत केलेल्या, त्याचप्रमाणे भारतीय ऑलिम्पिक संघटना, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन या संघटनांशी संलग्न असलेल्या क्रीडा प्रकारांत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना हे गुण मिळणार आहेत. यासाठी १ जून ते २९ फेब्रुवारी या कालावधीत झालेल्या स्पर्धाच ग्राह्य़ धरण्यात येणार आहेत.

याबाबत राज्यमंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी सांगितले, ‘‘शासनाने याबाबत निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी कशी असावी याबाबत राज्यमंडळाकडून परिपत्रक काढण्यात येईल. राज्यमंडळाच्या समितीसमोर हा निर्णय ठेवून अंमलबजावणीचे निर्णय घेण्यात येतील. या शैक्षणिक वर्षांअखेरीस होणाऱ्या परीक्षेपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल. त्याचप्रमाणे लेखी परीक्षेत किमान ३५ टक्के गुण बंधनकारक करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणीही या वर्षांपासून होणार आहे. त्याबाबतही लवकरच परिपत्रक काढले जाईल.’

गुण कसे मिळणार?

’आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या आणि राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम, द्वितीय किंवा तृतीय क्रमांक मिळालेल्या विद्यार्थ्यांना २५ गुण

’राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना २० गुण

’राज्य स्तरावरील क्रीडा स्पर्धामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना १५ गुण

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2015 2:55 am

Web Title: ssc hsc students who play sports will get direct marks
टॅग Hsc,Sports,Ssc
Next Stories
1 राज्यातील १७ ‘फास्ट फूड’ उत्पादनांच्या तपासणीचे आदेश
2 मराठवाडय़ातील उत्कृष्ट गावांचा विभागीय आयुक्तालयात सन्मान
3 जेसीबी कामावर मजुरांची उपस्थिती; जलयुक्त शिवार कामाचे िबग फुटले!
Just Now!
X