जिद्द, आत्मविश्वास, कष्ट आणि चिकाटीच्या बळावर शहरातील कुंभारगल्लीतील अतिश विजय बोरा या अनाथ मुलाने दहावीच्या परीक्षेत ८७.८० टक्के गुण मिळविले. हॉटेलमध्ये सुट्टीत वेटर म्हणून काम करणाऱ्या या मुलाने मिळविलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अतिश बोरा याचे आईवडील लहानपणीच वारले. अनाथ असलेल्या अतिशचा सांभाळ त्याची आत्या सविता उसरे हिने केला. त्यांची आर्थिक परिस्थितीही बेताची आहे, मात्र त्यांनी अतिशच्या शिक्षणासाठी त्याला पाठबळ देत मार्गदर्शन केले. नगरच्या रिमांड होममध्ये अतिश हा सातवीपर्यंत होता. तेथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. नंतर नगरच्या रामकरण सारडा विद्यार्थी वसतिगृहात राहून त्याने दादा चौधरी विद्यालयातून दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. सुट्टीत तो हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतो. नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत त्याला ८७.८० टक्के गुण मिळाले. खासगी शिकवणी नाही, शाळेतील शिक्षण व अभ्यास करून त्याने हे यश संपादन केले.

दहावीची परीक्षा दिल्यानंतर अतिश श्रीरामपूरला आत्याकडे आला आहे. सध्याही तो हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत आहे. दहावीच्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर अतिशच्या यशाची व खडतर प्रवासाची माहिती सर्वाना झाली. कालव्याच्या कडेला बेलापूर पुलाजवळ असलेल्या पालिकेच्या व्यापारी संकुलातील दुकानदारांनी त्याचे अभिनंदन केले. पुढील शिक्षणासाठी वसतिगृहाचे भोसले यांचे सहकार्य मिळत असल्याचे त्याने सांगितले. आत्या सविता उसरे, मामा दयानंद चांदेकर, बहीण सुनीता देशमुख, आरती शदे यांचा आपल्या वाटचालीत वाटा असल्याचे त्याने सांगितले.

सकाळी वृत्रपत्राची तर संध्याकाळी चपलांची विक्री करून शिक्षण घेणाऱ्या सचिन नामदेव अनुष्ठान यानेही प्रतिकूल परिस्थितीत दहावीच्या परीक्षेत ६८ टक्केगुण मिळविले. त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सचिन याने गोंधवणी भागातील श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटी हायस्कूलमधून दहावीची परीक्षा दिली. शाळेत शिकत असताना सकाळी तो वृत्तपत्र विकतो, तर सायंकाळी भावासोबत दोन तास रस्त्यावर चपला विकतो. आता तो सुट्टीच्या काळात रसवंतिगृहात काम करत आहे.