मनाशी ठाम निर्धार केला तर खडकातूनही पाणी काढू शकतो, मग इतर गोष्टीचं काय? असं नेहमी ऐकायला मिळत. अगदी अशाच पद्धतीचं आदर्श उदाहरण महाराष्ट्रातील सावित्रीच्या लेकीनं निर्माण केलं आहे. महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमधील ६०० लष्करात नोकरी करणाऱ्या माजी जवानांच्या पत्नींनी एकत्र येत बचत-गटांमार्फत ट्रॅवल्स कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. या महिलांनी सुरूवातीला पुणे महानगर परिवर्तन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपीएमएल) ४४ बस भाडेतत्वावर घेतल्या आहेत. रविवारीपासून शहरातील सर्व रस्त्यांवर या बस धावणार आहेत.

बस खरेदी करण्यासाठी महिलांनी स्वत: च्या बचतीतून तसेच बँकेतून कर्ज घेतले. राज्य सैनिक कल्याण मंडळातून आर्थिक मदत मिळाल्यास या उपक्रमाला हातभार लागेल, असे मत या महिलांनी व्यक्त केले आहे. सातारा जिल्ह्यात असलेल्या विश्व योद्धा शेतकरी मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीद्वारे एकत्र येत राज्यभरातील ४४ बचत गटांनी प्रत्येकी एक बस खरेदी केली आहे. या कंपनीने पीएमपीएमएलशी पुढील सात वर्षांच्या बसगाड्या चालविण्याबाबत करार केला आहे. कंपनीने दरमहा सरासरी ६००० किमी अंतर निश्चित दरासह पूर्ण करण्याचे ठरवले आहे.

“सैनिक कल्याण विभाग कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवितो. माजी सैनिकांच्या उन्नतीसाठी बरेच कार्यक्रम घेण्यात येतात, परंतु माजी सैनिकांच्या बचत गटांमार्फत असा पुढाकार घेवून एक ट्रान्सपोर्ट कंपनी पहिल्यांदाच स्थापन करण्यात आली आहे, असे कर्नल (निवृत्त) आर.आर. जाधव म्हणाले. जाधव हे राज्य सैनिक कल्याण विभागाचे कार्यकारी संचालक आहेत. यामुळे माजी संरक्षण कर्मचार्यांच्या पत्नींना अतिरिक्त उत्पन्न मिळविण्यात मदत होईल आणि त्याचबरोबर पुणे महानगर प्रदेशातील स्थानिक रहिवाशांना प्रवासासाठी आणखी बसेस उपलब्ध होतील, असे जाधव म्हणाले.

सातारा जिल्ह्यातील सैनिक कल्याण विभागात जाधव यांच्या कार्यकाळात माजी सैनिक सुरेश गोडसे यांनी ही कल्पना सुचवली होती. “एवढ्या मोठ्या प्रमाणावर पुढाकार घेऊन माजी सैनिकांच्या पत्नींकडून १८.०४ कोटी रुपयांची गुंतवणूक करणे सोपे नव्हते. सुदैवाने, हा उपक्रम प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांना सर्व सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले आहे,” असे सुरेश गोडसे यांनी सांगितले.

सातारा येथील जैतापूर येथील वक्रतुंड माजी सैनिक महिला स्वयम सहायत्ता बचत गटानेही या कंपनीमध्ये गुतंवणूक केली आहे. माजी सैनिकांच्या अतिरिक्त उत्पन्नासाठी असे उपक्रम राबविले जातात, असे बचत गटाच्या अध्यक्षा मनीषा गुजर यांनी सांगितले. या उपक्रमामुळे अधिक पैसे  मिळणार असल्याने आमच्या आशा वाढल्या आहेत. सर्व सदस्यांना या उपक्रमात सहभागी होण्यासाठी तयार करणे कठीण होते, परंतु नंतर सर्वांनी यासाठी योगदान दिले, असे गुजर म्हणाल्या.

४१ लाख किंमत असलेली प्रत्येक बस खरेदी करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रने बचत गटांना कमी व्याज दराने ३४ लाखांचे कर्ज दिले आहे तर उर्वरित रक्कम महिलांनी भरली आहे.

महिला बचत गटांपैकी प्रत्येकाला मिळकत म्हणून दरमहा २५,००० रुपये मिळतील, तर संपूर्ण महिन्यासाठी बसचा एकूण खर्च काढून प्रशासकीय खर्चासाठी ७ हजार रुपये कंपनीला देण्यात येतील. साधारणपणे पाच वर्षांत कर्जाची परतफेड झाल्यानंतर प्रत्येक बचत गटांना दरमहा ६० हजार रुपये अतिरिक्त उत्पन्न मिळेल असे गोडसे यांनी सांगितले.

रविवारपासून या बस धावणार आहेत. तसेच हळूहळू लॉकडाऊननंतर या कंपनीच्या ४४ बसेस टप्प्याटप्प्याने पीएमपीएमएलमध्ये समाविष्ट केल्या जातील, असे पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी सांगितले. सध्या पीएमपीएमएलने कात्रजजवळ गुजरावाडी येथे या बसच्या पार्किंगसाठी स्वतंत्र बस डेपो दिला आला आहे.