तांत्रिक दोषामुळे रस्त्यातच बंद पडलेल्या शहर बसमुळे गुरुवारी सायंकाळी कॅनडा कॉर्नर परिसरात वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. परंतु, या वेळी ही बस रस्त्याच्या बाजूला नेण्यासाठी धक्का मारण्याची तसदी प्रवाशांनी घेतली नाही. तिकीट काढले असल्याने बसमधून खाली उतरण्यास ते तयार नव्हते. अखेर वाहतूक कोंडीत अडकलेल्या आणि काही स्थानिकांनी धक्का मारून बंद पडलेली बस बाजूला नेण्याचा प्रयत्न केला. प्रवाशांनी खच्चून भरलेल्या या बसला धक्का मारताना त्यांची दमछाक होत असली तरी प्रवाशांनी मात्र मदतीचा हात पुढे केला नाही.
शहरातील अनेक प्रमुख रस्ते वेगवेगळ्या कारणांमुळे वाहतूक कोंडीत गुरफटलेले आहेत. त्यापैकी एक म्हणजे कॅनडा कॉर्नरपासून सुरू होणारा कॉलेजरोड. महाविद्यालयीन परिसरामुळे ‘धूम स्टाइल’ने वाहन चालविणाऱ्यांची या रस्त्यावर कमतरता नाही. उलट अन्य वाहनधारकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागते. गुरुवारी सायंकाळी या ठिकाणी विचित्र कारणामुळे झालेली वाहतूक कोंडी बराच वेळ दूर होऊ शकली नाही. कॅनडा कॉर्नर परिसरातून मार्गस्थ होणारी शहर वाहतुकीची बस अचानक बंद पडली. तांत्रिक दोषामुळे ती काही केल्या सुरू होत नव्हती. परिणामी, वाहक व चालकाने बस बाजूला नेण्यासाठी प्रवाशांना खाली उतरण्याची विनंती केली. परंतु कोणी उतरण्याच्या मन:स्थितीत नव्हते. प्रवासाचे तिकीट काढले असल्याने खाली उतरणार नसल्याची भूमिका अनेकांनी घेतली. त्यामुळे चौकातील रस्त्यांवर इतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. विनंती करूनही प्रवासी खाली उतरत नसल्याने वाहक व चालकांचे त्यांच्याशी शाब्दिक चकमकी झडल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात आले.
२० ते २५ मिनिटे होऊनही ही कोंडी फुटत नसल्याचे पाहून स्थानिक युवक आणि कोंडीत अडकलेल्या वाहनधारकांनी प्रवाशांसह या बंद पडलेल्या बसला धक्का मारून बाजूला नेण्याचा प्रयत्न केला. प्रवाशांची संख्या मोठी असल्याने बस बाजूला नेताना त्यांची दमछाक झाली. परंतु, बसमधील प्रवासी मदतीला पुढे आले नाहीत, असे या कोंडीत अडकलेल्या वाहनधारकांकडून सांगण्यात आले. दरम्यानच्या काळात एसटी महामंडळाचे मदत पथक दुसरी बस घेऊन घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बंद पडलेल्या बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवून पुढे मार्गस्थ केले. त्यानंतर बंद पडलेली बस आगारात नेण्याची खटपट सुरू केली. या घटनाक्रमात नेमका दोष कोणाचा, हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहिला.
संग्रहित लेख, दिनांक 15th Nov 2013 रोजी प्रकाशित
बंद पडलेली बस अन् प्रवाशांच्या दोन तऱ्हा
तांत्रिक दोषामुळे रस्त्यातच बंद पडलेल्या शहर बसमुळे गुरुवारी सायंकाळी कॅनडा कॉर्नर परिसरात वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. परंतु, या वेळी ही बस
First published on: 15-11-2013 at 01:56 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Struck down bus and passengers mentality