मंदार लोहोकरे
पुणे-पंढरपूर पालखी मार्गावर भंडीशेगावजवळ असलेली ऐतिहासिक आणि वारी परंपरेत महत्त्व असलेली ‘बाजीराव विहीर’ या महामार्गाच्या रुंदीकरणात येत असल्याने ती वाचवण्यासाठी सध्या प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची धडपड सुरू आहे. सर्व स्तरांतून या विहिरीचे जतन करण्याची मागणी होत आहे.
पुणे-पंढरपूर पालखी मार्गाला नुकताच राष्ट्रीय महामार्ग दर्जा दिला असून त्याच्या रुंदीकरणाचे काम वेगात सुरू आहे. या मार्गावरच पंढरपूरजवळ भंडीशेगाव येथे ऐतिहासिक अशी ‘बाजीराव विहीर’ आहे. या मार्गावरून जाणाऱ्या वारक ऱ्यांची तहान भागवण्यासाठी थोरले बाजीराव पेशवे यांनी ही विहीर खोदली आणि बांधली असल्याचे सांगितले जाते. या विहिरीला जसे ऐतिहासिक महत्त्व आहे, तसेच वारकरी संप्रदायातही मोठे महत्त्व आहे. या विहिरीच्या जवळच वारीवेळी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील उभे आणि गोल रिंगण होते. या रिंगण सोहळय़ाचीही शेकडो वर्षांची परंपरा आहे. या विहिरीचे हे ऐतिहासिक आणि वारी परंपरेतील नाते लक्षात घेत तिचे जतन करण्याची मागणी होत आहे.
ही भल्या मोठय़ा आकाराची दगडी चिऱ्यांमध्ये बांधलेली विहीर आहे. ११२ फूट लांब, तर १५ फूट रुंद असा तिचा आकार आहे. विहिरीत उतरण्यासाठी एक बाजूने मोठा पायरी मार्ग केलेला आहे. या विहिरीजवळूनच पुणे-पंढरपूर पालखी मार्ग जातो. या मार्गाला मोहोळ- पंढरपूर- देहू- आळंदी राष्ट्रीय महामार्ग असा दर्जा नुकताच मिळाला आहे. या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या कामामध्ये सेवारस्त्याच्या मार्गात ही विहीर येत असल्याने प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणापुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे.
या विहिरीचे ऐतिहासिक आणि वारी परंपरेतील महत्त्व लक्षात घेऊन या स्मारकाचे जतन करत महामार्गाची आखणी केली जाणार आहे. यासाठी या भागात सेवा रस्त्याची पर्यायी व्यवस्था केली जाईल.
– संजय कदम , प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग
‘बाजीराव विहीर’ हे ऐतिहासिक स्मारक आहे. परंतु याशिवाय या विहिरीच्या साक्षीने येथे दरवर्षी होणाऱ्या माउली-तुकोबांच्या पालखी सोहळय़ातील गोल आणि उभ्या रिंगणांमुळे वारकरी संप्रदायात देखील या स्थळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यामुळे रस्ता रुंदीकरण करताना या विहिरीचे जतन झालेच पाहिजे.
– ह. भ. प. राणा महाराज वासकर
‘बाजीराव विहीर’ या स्मारकाचे ऐतिहासिक आणि वारी परंपरेतील महत्त्व लक्षात घेत या स्मारकाचे जतन केले जाईल. यासाठी संबंधित विभागाने तांत्रिक बाबी तपासून योग्य पर्याय देण्याचे आदेश दिले आहेत.
– सचिन ढोले , प्रांताधिकारी, पंढरपूर
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 8, 2020 12:00 am