वर्धा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातील तज्ज्ञांच्या पथकांची देखरेख

वर्धा : अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या देखरेखीमुळे प्राणवायूची गळती थांबवण्यात प्रशासनाला यश आले असून आता प्रतिदिन पाच मे.टन प्राणवायूची बचत साध्य झाली आहे. नाशिक जिल्हय़ात झालेल्या प्राणवायू गळतीच्या दुर्दैवी घटनेनंतर अशा घटना होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेणे सुरू केले होते. त्यासाठी श्रीमन्ननारायण तंत्रनिकेतन, बजाज इन्स्टिटय़ूट ऑफ  टेक्नॉलॉजी, अग्निहोत्री अभियांत्रिकी व बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच हिंगणघाट औद्योगिक प्रशिक्षण संस्था व आर्वीच्या शासकीय तंत्रनिकेतन संस्थेतील तज्ज्ञांचे पथक गठित करण्यात आले. या पथकाने सर्व करोना रुग्णालयातील प्राणवायू टाकीपासून पुरवठा करणारी वाहिनी तसेच रुग्णालयातील प्राणवायू सिलिंडर कक्ष याची दैनंदिन तपासणी सुरू केली. रुग्णालयात योग्य पद्धतीने प्राणवायू वापरला जात आहे अथवा नाही, यावर निगराणी ठेवण्यात आली. बऱ्याच ठिकाणी त्रुटी निदर्शनास आल्या. त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात आली. अयोग्य साधने बदलण्यात आली.

याचीच फ लश्रूती म्हणून दैनंदिन पाच मे.टनची बचत होत असल्याचे सिद्ध झाले. २३ एप्रिलच्या नोंदीनुसार जिल्हय़ात सहाशे प्राणवायू खाटांसाठी १६ ते १७ मे.टन प्रतिदिवस प्राणवायूची मागणी होती. आज एवढय़ाच प्राणवायू पुरवठय़ावर ७०० ते ८०० प्राणवायू खाटांवरील रुग्णांवर उपचार होत आहे. पूर्वी प्रतिरुग्ण १६ लिटर प्रतिमिनिट, प्रतिदिवस प्राणवायू लागत असे. आज हे प्रमाण ११ लिटर प्रतिमिनिट, प्रतिदिवस एवढय़ावर आले आहे. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार म्हणाल्या की, प्राणवायू गळतीचा प्रश्न सोडवण्याची बाब अग्रक्रमावर घेण्यात आली. गळती शोधणे व योग्य वापर होण्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तज्ज्ञांनी पुरवलेले तंत्रज्ञान कामी आले. बचत झाल्याने अधिकाधिक रुग्णांना प्राणवायू पुरवता येतो, याबद्दल समाधान वाटते.