मांजरा सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाच्या निवडणुकीत विलासराव देशमुख सहकार पॅनेलने दमदार यश मिळविले, तर देशमुख पॅनेलने तब्बल ९० टक्के मते मिळविली. विकास व रेणा सहकारी साखर कारखान्यातील सभासदांनी जो कौल दिला, त्याचाच कित्ता ‘मांजरा’च्या सभासदांनीही गिरवला. विरोधकांना ८ टक्के मतांवरच समाधान मानावे लागले.
महिला तंत्रनिकेतन महाविद्यालयात सोमवारी सकाळी मतमोजणीस प्रारंभ झाला. २१ संचालकांपकी आमदार दिलीपराव देशमुख हे बिगर उत्पादक सहकारी संस्था व पणन संस्था मतदारसंघातून, तर याच पॅनेलच्या उज्ज्वला कदम व मंगलबाई पाटील बिनविरोध निवडून आल्या. उर्वरित १८ जागांसाठी ११ हजार ९९६ पकी ८ हजार ९७५ मतदारांनी मतदान केले. ७६.७४  टक्के मतदारांपकी जवळपास ९० टक्के मते विलासराव देशमुख पॅनेलच्या उमेदवारांना प्राप्त झाली. विलासराव देशमुख पॅनेलला सरासरी ८ हजार ते ८ हजार ३००, तर विरोधकांना केवळ ४०० ते ६०० मते मिळाली. बाद मतांची संख्या २०० ते ४५० आहे. मतमोजणी केंद्राबाहेर गुलाल उधळून व फटाके फोडून समर्थकांनी आनंद व्यक्त केला.
निवडणूक निर्णय अधिकारी प्रताप काळे व निवडणूक सहायक अधिकारी मधुकर गुंजकर यांनी मतमोजणीनंतर निकाल जाहीर केला. विरोधी गटाचे प्रमुख अॅड. बळवंत जाधव यांनी मतदारांचा निर्णय आपल्याला मान्य असून सहकारातील दहशत कमी करण्यासाठी व शुद्धीकरणासाठी आपण यापुढेही लढत राहू, असे सांगितले.