इंधनाच्या वाढत जाणाऱ्या किमती, महागाईमुळे गृहिणींना करावी लागणारी काटकसर हा नित्याचाच विषय. थोडे जरी गॅसचे दर वाढले की आपले लक्ष इंधन बचतीकडे जाते. यावर उपाय शोधण्यासाठी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एलपीजी बचत करणारा प्रोजेक्ट तयार केला.
शिवाजी अभियांत्रिकीच्या प्रोजेक्ट यांत्रिकी शाखेतील अंतिम वर्षांच्या यश घोडके, गजानन जगताप, भगवान इंगळे, ओम घेवारे या विद्यार्थ्यांनी हा प्रोजेक्ट तयार केला. दैनंदिन घरगुती वापरातील एलपीजी टँक व शेगडी यांच्यात अतिरिक्त दबावयुक्त हवेच्या टाकीद्वारे हवा, एलपीजी यांचे योग्य प्रमाणात मिश्रण करून ते शेगडीला पाठवण्यात आले. हा प्रोजेक्ट करीत असताना विद्यार्थ्यांच्या लक्षात आले की, एका कुटुंबाला वर्षांला १२ सिलेंडर लागत असतील, तर ही किट वापरल्यास सामान्य माणसाला वर्षांला दहा सिलेंडर लागतील. म्हणजेच एका कुटुंबाला वर्षांला २ सिलेंडरची बचत करता येईल व वाढणाऱ्या महागाईवर नियंत्रण करता येईल. ही किट वापरल्यास कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाही, असे यंत्र विद्यार्थ्यांनी यात वापरले. प्राचार्य बालाजी बच्चेवार, प्रा. जयकुमार मुळे व भगवान िशदे यांचे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले.