रेल्वे स्टेशनच्या आवारातील फेरीवाल्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेरीवाल्यांवरील कारवाईसाठी दिलेले अल्टिमेटम संपल्यानंतर शनिवारी सकाळी मनसैनिकांनी ठाण्यात फेरीवाल्यांना हटवले. फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची तोडफोड  करत मनसैनिकांनी फेरीवाल्यांना हाकलून दिले.

गेल्या महिन्यात एल्फिन्स्टन रोड पुलावरील चेंगराचेंगरीत २३ लोक मरण पावल्यानंतर सर्वत्र रेल्वे प्रशासनाविरोधात आणि केंद्रातील भाजप सरकारविरोधात तीव्र संताप निर्माण झाला होता. राज ठाकरे यांनी ५ ऑक्टोबररोजी मेट्रो ते चर्चगेट असा ‘संताप मोर्चा’चे आयोजन केले होते. या मोर्चात राज ठाकरेंनी रेल्वे प्रशासनाला इशारा दिला होता. मुंबईतील रेल्वे स्थानके, पूल आणि रेल्वे स्थानक परिसरात बसणारे फेरीवाले यांना १५ दिवसात हटवा, अन्यथा सोळाव्या दिवशी मनसे आपल्या पद्धतीने फेरीवाल्यांना हटवेल असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता.

शनिवारी राज ठाकरेंनी दिलेले अल्टिमेटम संपले असून सकाळी ठाण्यात मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिकांनी आंदोलन केले. फेरीवाल्यांच्या स्टॉलची तोडफोड करत मनसैनिकांनी त्यांना हाकलून दिले. या घटनेनंतर स्टेशन परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. ‘काही जण आले, त्यांनी घोषणा दिल्या, आमच्या सामानाची तोडफोड केली आणि निघून गेले’, असे एका फेरीवाल्याने सांगितले. मनसेच्या अल्टिमेटमनंतरही फेरीवाल्यांच्या परिस्थितीत बदल झालेला नाही. ठाणे आणि अन्य रेल्वे स्टेशनच्या आवारातील फेरीवाले ठाण मांडून आहेत. त्यामुळे आता मनसेच्या या खळ खट्याकमुळे फेरीवाल्यांवर वचक निर्माण होईल का असा प्रश्न उपस्थित होत आहे.