राज्यात काल दिवसभरात कोरोना बाधित 187 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. एकूण रुग्ण संख्या 1761 पोहचली आहे. यापैकी 208 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.  अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

मुंबई महानगर, पुणे परिसरातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यात सध्या लागू असलेली टाळेबंदी किमान ३० एप्रिलपर्यंत वाढविण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी के ली. मुंबई, पुण्यातील निर्बंध अधिक कडक करतानाच करोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या भागांमध्ये अंशत: दिलासा देण्याचे संकेतही मुख्यमंत्र्यांनी दिले. याबाबत मंगळवारपूर्वी सरकार धोरण जाहीर करणार आहे.

तर देशभरात गेल्या 24 तासांत आणखी 909 जणांना करोनाची लागण झाली असून 34 जणांचा मृत्यू झाल्याने देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या 8356 वर पोहोचली आहे तर मृतांची एकूण संख्या 273 वर पोहोचली आहे.

देशातील 586 रुग्णालयांमध्ये करोना रुग्णांवर उपचार करण्यात येत असून तेथे एक लाखाहून अधिक विलगीकरण खाटा आणि अतिदक्षता विभागातील 11 हजार 500 खाटा करोनाबाधितांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत, असे आरोग्य मंत्रालयातर्फे शनिवारी सांगण्यात आले.  सरकारने संचारबंदी आणि अन्य निर्बंध लादले नसते तर 15 एप्रिलपर्यंत देशातीलबाधितांची संख्या 8.2 लाखांहून अधिक झाली असती, असे आरोग्य मंत्रालयातील सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले.