राज्यातील काही भागात आठवड्याभरापूर्वी मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणावरील टोळधाड आली होती. अशी टोळधाड पिकांचं मोठं नुकसान करते, त्यामुळे त्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतो. या पार्श्वभूमीवर या टोळधाडीचा बिमोड करण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. नागपूर येथे यासंदर्भात एक अनोखा प्रयोग करण्यात आला. ड्रोनद्वारे या टोळधाडीवर नियंत्रण ठेवता येते का? याची चाचपणी करण्यात आली. राज्यातील हा पहिलाच प्रयोग ठरला आहे.

मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वत रांगांमधून महाराष्ट्रात २५ मे रोजी टोळधाड आली होती. या किटकांचा नायनाट करण्यासाठी त्यांच्यावर रासायनिक फवारणी करुन नष्ट करण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून गेल्या चार-पाच दिवसांपासून प्रयत्न करण्यात येत होते. यामध्ये शेतांमध्ये फवारणी करणे तसेच उंच झाडांवर हे किटक रात्रीचा मुक्काम करतात त्या ठिकाणी रात्री फायरब्रिगेडच्या माध्यमातून हायड्रोक्लोरो क्लोरोसिन, क्लोरोव्हायरोफॉस या औषधाची फवारणी करुन त्या किटकांचा नायनाट केला जात आहे.

आणखी वाचा- #MissionBeginAgain: ठाकरे सरकारकडून ‘या’ सहा गोष्टींवरील निर्बंध शिथील

जी उंच झाडं असतात या झाडांवर हे किटक थांबतात. त्यामुळे पहाटे चार-पाच वाजण्याच्या दरम्यान त्यांच्यावर फवारणी केली जाते आणि त्या किटकांचा नायनाट केला जातो. यापूर्वी फायरब्रिगेडच्या बंबांचा वापर करुन हे कार्य करण्यात येत होतं. परंतू काही झाडं त्यापेक्षा उंच आणि जिथे त्यांचं वाहन जाऊ शकत नाही ज्या ठिकाणी हे किटक राहतात. त्यासाठी ड्रोनचा वापर करुन त्यांच्यावर किटकनाशकं फवारण्याचा विचार करण्यात आला.

या प्रयोगासाठी दोन ड्रोन पुण्याहून खास नागपूरमध्ये मागवण्यात आले असून याच्या माध्यमातून ही कीड नष्ट करण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली.