महाराष्ट्रात सध्या मध्यावधी निवडणुकांसारखी परिस्थिती आहे असं वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष यांचं जे सरकार आहे त्या सरकारमध्ये समन्वय नाही. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे असं त्यांनी म्हटलं आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं. मध्यावधी निवडणूक ही खरंतर कुणालाच नको असते. कारण एक निवडणूक लढणं पक्षाला काय आणि उमेदवाराला काय अवघडच असतं.

पैसे किंवा खर्च हा एकमेव मुद्दा नसतो तर खूप वेळ जातो, अनिश्चतता असते. आज निवडून आलेले आमदार उद्या असतील की नाही ते ठाऊक नसतं. त्यामुळे मध्यावधी निवडणुका कुणालाच नको आहेत. पण अस्थिरतेमधून मार्ग कसा काढायचा हे पण लक्षात येत नाही. मध्यावधी निवडणूक होऊ नये म्हणून सगळेच प्रयत्न करतील. पण शेवटी कुणाचीच कॉम्बिनेशन जुळली नाहीत, तर काहीही पर्याय उरणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

दोन दिवसांपूर्वीच शिवसेना खासदार संजय राऊत आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट मुंबईत झाल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं होतं. मात्र ही भेट सामनाच्या मुलाखतीसाठी होती हे भाजपातर्फे सांगण्यात आलं. दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी याबद्दल भाष्य करताना हे सरकार अंतर्विरोधातून पडेल असं वक्तव्य केलं होतं. दरम्यान आज चंद्रकांत पाटील यांनी राज्यात मध्यावधी निवडणूक होऊ शकते अशी परिस्थिती आहे असं म्हटलं आहे.

काय म्हणाले नवाब मलिक?

दरम्यान राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी भाजपा सत्तेचं स्वप्न अजूनही पाहतं आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे  जे नेते भाजपात गेले होते ते आता परत आमच्या पक्षात येण्याच्या तयारीत आहेत. त्यांना थोपवण्यासाठी भाजपाकडून असे दावे केले जात आहे. तिन्ही पक्षांमध्ये पूर्ण समन्वय आहे आणि तिन्ही पक्षांचं सरकार बळकट स्थितीत आहे असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.