संदीप आचार्य 
मुंबई : राज्यातील करोना रुग्णांची संख्या जेवढ्या वेगाने वाढत आहे, त्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही प्रचंड आहे. जवळपास ७३.१७ टक्के रुग्ण बरे झाल्याची शासनाची अधिकृत माहिती असली तरी प्रत्यक्षात बरे झालेल्या एक लाख आठ हजार रुग्णांची नोंदच भारतीय वैद्यक संशोधन केंद्राच्या (आयसीएमआर) पोर्टलवर झाली नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. ही नोंद झाली असती तर बरे झालेल्या रुग्णांची टक्केवारी वाढली असती.

राज्यात सलग तिसऱ्या दिवशी २६ हजारांहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले असून त्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या कमी होताना दिसते आहे. गेल्या आठवड्यात रोज २१ ते २४ हजार रुग्ण सापडत होते. रविवारी २० हजार ५९८ नवीन करोना रुग्णांची नोंद करण्यात आली. राज्यात १२ लाख आठ हजार ६४२ करोना रुग्णांची नोंद असून त्यापैकी आठ लाख ८४ हजार ३४१ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची नोंद आहे. बरे होण्याचे हे प्रमाण ७३.१७ टक्के एवढे आहे. आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, जवळपास एक लाखाहून अधिक बरे झालेल्या रुग्णांची नोंदच वेगवेगळ्या रुग्णालयांनी ‘करोना पोर्टल‘वर केलेली नाही, अशी माहिती उघड झाली आहे.

यासाठी ९ ते १९ सप्टेंबर या काळात दाखल झालेल्या रुग्णांचा तपशील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतला. या काळात रोज दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेण्यात आली. सामान्यतः रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झालेल्या रुग्णाचा मृत्यू न झाल्यास दहाव्या दिवशी रुग्ण बरा होऊन घरी जात असतो. काही ज्येष्ठ रुग्णांना १४ दिवसांपर्यंत रुग्णालयात उपचारासाठी राहावे लागत असले तरी बहुतेक रुग्ण बरे होऊन दहाव्या दिवशी घरी जातात. ९ ते १९ सप्टेंबर या काळात दाखल झालेले रुग्ण व बरे होऊन घरी गेलेले रुग्ण आणि पोर्टलवरील नोंद असलेल्या रुग्णांची तफावत असल्याचे आरोग्य विभागाच्या लक्षात आले.

याबाबत अधिक माहिती घेतली असता ठाणे, पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर येथे रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे उपचारात गुंतलेल्या अनेक रुग्णालयांनी बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांचा तपशील पोर्टलवर नोंदवला नसल्याचे दिसून आले. साधारणपणे एक लाख आठ हजार रुग्णांची नोंद झालेली नसून आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित रुग्णालयांना तात्काळ बरे झालेल्या रुग्णांची माहिती देण्यास सांगितले आहे.

यापूर्वी करोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद अनेक रुग्णालयांनी न केल्यामुळे करोना मृत्यू लपवल्याबाबत मोठी टीका झाली होती. प्रामुख्याने हे मृत्यू मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील रुग्णालयांत झाले होते. मात्र रुग्ण बरे झाल्याची नोंद न झाल्याचे कोणाच्या फारसे लक्षात आले नाही. यामुळेच महाराष्ट्रात केवळ करोना रुग्ण जास्त असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आगामी काही दिवसात या एक लाख आठ हजार बरे झालेल्या रुग्णांची नोंद झाल्यानंतर महाराष्ट्राची प्रतिमा निश्चित बदलेल असा विश्वाास आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.