मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष व औरंगाबादचे माजी महापौर डॉ. भागवत कराड यांना भाजपाकडून राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. उदयनराजे भोसले, रामदास आठवले व डॉ. भागवत कराड असे भाजपाचे तीन उमेदवार निश्चित झाले आहेत.

या पैकी उदयनराजे भोसले व रामदास आठवले यांनी आज आपला आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या वेळी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री पंकजा मुंडे, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह भाजपाच्या अन्य नेत्यांची उपस्थिती होती. भाजपाकडून राज्यसभेसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.

डॉ. भागवत कराड हे दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी भाजपा नेते एकनाथ खडसे, हंसराज आहिर, किरीट सोमय्या, संजय काकडे व विजया रहाटकर यांची देखील नावं चर्चेत होती. या अगोदर संजय काकडे यांनी भाजपाच्या राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी माझ्या नावाचा विचार होईल, असं मत  व्यक्त केलं होतं.

आणखी वाचा- राज्यसभा निवडणूक : शिवसेनेकडून प्रियंका यांना उमेदवारी

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांसाठी २६ मार्च रोजी निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख शुक्रवार, १३ मार्च (उद्या) आहे. संख्याबळानुसार महाविकासआघाडीचे चार तर भाजपाचे तीन उमेदवार निवडून येऊ शकतात.