राज्यात मागील काही दिवसांपासून करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना, आज काहीशी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आज दिवसभरात राज्यात ५ हजार ३५ जणांनी करोनावर मात केली. तर, ५ हजार २१० करोनाबाधित रुग्ण वाढले. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९४.९६ टक्के झाले आहे.

आतापर्यंत आजपर्यंत राज्यात एकूण १९ लाख ९९ हजार ९८२ रुग्ण करोनातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे. तर, राज्यात सध्या ५३ हजार ११३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.

राज्यातील आजची करोनाबाधितांची आकडेवारी जरी काहीशी दिलासादायक असली, तरी देखील प्रमुख शहरांमध्ये करोनाबाधितांची संख्या अद्यापही वाढतच आहे. पुण्यात आज दिवसभरात ३२८ नवे करोनाबाधित वाढले असून, चार रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. शहरातील एकूण बाधितांची संख्या आजअखेर १ लाख ९८ हजार २९२ वर पोहचली आहे. आतापर्यंत ४ हजार ८३० रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान, आज ३१८ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्जही मिळाला आहे. आजअखेर शहरात १ लाख ९० हजार ५६० जण करोनामुक्त झालेले आहेत.