महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी उद्या, बुधवारी सभा होत असून, या पदासाठी तीन इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गणेश भोसले, शिवसेनेच्या छाया तिवारी व अपक्ष परंतु राष्ट्रवादीच्याच गोटातील उषा ठाणगे यांचे तीन अर्ज आहेत. सभापतिपदी भोसले यांचीच निवड होण्याची अधिक शक्यता आहे.
सभापतिपदासाठीची निवड सभा जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज, मंगळवारी दुपारी २ पर्यंत होती. वरील तिघे व शिवसेनेचे अनिल बोरुडे अशा एकूण चौघांनी अर्ज नेले होते. भोसले यांच्या अर्जावर राष्ट्रवादीचे संपत बारस्कर सूचक तर राष्ट्रवादीचेच गटनेते समद खान अनुमोदक आहेत. तिवारी यांच्या अर्जावर सूचक म्हणून बोरुडे तर अनुमोदक म्हणून भाजपच्या उषा नलावडे आहेत.
अपक्ष नगरसेविका ठाणगे यांनी ऐनवेळी अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून शिवसेनेचे सचिन जाधव व भाजपचे श्रीकांत छिंदम अनुमोदक आहेत. यापूर्वी ठाणगे सत्ताधारी गोटात होत्या. त्यांच्या या भूमिकेमुळे सत्ताधाऱ्यांचे समितीमधील संख्याबळ एकने कमी होऊन ९ तर विरोधकांचे बळ वाढले आहे.
सभा सुरू झाल्यानंतर जिल्हाधिकारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत देतील, त्या वेळी विरोधकांकडून तिवारी की ठाणगे उमेदवार असतील याबद्दल चर्चा होत आहे.