उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अर्थात, बुधवारी निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असले तरी यवतमाळ जिल्ह्य़ातील सातही मतदारसंघात लढतीचे चित्र आजच स्पष्ट झाल्यासारखे आहे. अपक्षांची प्रत्येक मतदारसंघात झालेली भाऊगर्दी कमी करण्यासाठी प्रमुख उमेदवारांनी आपापल्या परीने प्रयत्न चालवले असून या प्रयत्नांना मिळत असलेल्या प्रतिसादामुळे चित्र स्पष्ट होत आहे.
यवतमाळ मतदारसंघात काँग्रेसच्या विद्यमान आमदार नंदिनी पारवेकर यांची उमेदवारी अगदी शेवटच्या क्षणी कापून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे पुत्र राहुल ठाकरे यांना ती देण्यात आल्यामुळे कमालीच्या संतप्त झालेल्या नंदिनी यांची ठाकरे गटापकी कुणीही समजूत काढली नाही. इतकेच नव्हे, तर राहुल ठाकरे यांनी उमेदवारी दाखल करतांना नंदिनी पारवेकरांनी सोबत रहावे, अशी साधी विनंतीही केली नाही. त्यामुळे नंदिनी पारवेकरांना चाहणारा काँग्रेसमधील मोठा वर्ग नाराज असून त्यांची नाराजी कशी दूर करावी, हा प्रदेशाध्यक्षांना प्रश्न पडला आहे. विशेष म्हणजे, सोमवारी जेव्हा राहुल ठाकरे यांनी आपले वडील माणिकराव यांच्या उपस्थितीत लोहारा येथील केदारेश्वर मंदिरात प्रचाराचा नारळ फोडला तेव्हा नंदिनी पारवेकर हजर नव्हत्या आणि ही बाब सार्वत्रिक चच्रेचा विषय झाली.
या मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार संदीप बाजोरिया यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे, तर भाजपच्या मदन येरावार आणि शिवसेनेच्या संतोष ढवळे यांनी कार्यकर्त्यांची जमवाजमव करून प्रचार सुरू केला आहे. यवतमाळ मतदारसंघात ४६ उमेदवार असून त्यात १० उमेदवार राजकीय पक्षांचे आहेत, पण खरी लढत चौरंगीच असेल. वणी मतदारसंघात काँग्रेसच्या वामनराव कासावारांची निवडणूक लढण्याची ही पाचवी वेळ आहे. त्यांच्या विरोधातील सेनेचे पारंपरिक उमेदवार माजी आमदार विश्वास नांदेकर, राष्ट्रवादीचे संजय देरकर, असा तिरंगी सामना होणार असून भाजपने पहिल्यांदाच राजू रेड्डी बोदकुलवार यांना लढवले आहे. नगरपालिकेत सत्ता असलेल्या मनसेच्या राजू उंबरकर यांनीही अर्ज दाखल केला आहे. या मतदारसंघात २४ उमेदवार आहेत. राळेगाव आदिवासी राखीव मतदारसंघात लागोपाठ चारदा निवडून आलेले काँग्रेसचे प्रा. वसंत पुरके पाचव्यांदा सज्ज झाले आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीने मिलिंद धुर्वे यांना, भाजपने पारंपरिक उमेदवार अशोक उईके यांना लढवले आहे, तर शिवसेना प्रथमच लढत असून वसंत कनाके यांना उमेदवारी मिळाली आहे. या मतदारसंघात चौरंगी सामन्याचे चित्र आहे. आर्णी या अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघात एकदा पराभूत होण्याचा आणि एकदा अपक्ष म्हणूनही निवडून येण्याचा अनुभव घेतलेले कांॅग्रेसचे शिवाजीराव मोघे सातव्यांदा लढत आहेत. त्यांच्या विरोधात १९८५, १९९० मध्ये लढून पराभूत झालेले भाजपाचे उध्दव येरमे आता पुन्हा मदानात आहेत. यावेळी राष्ट्रवादी आणि शिवसेना प्रथमच लढत असून डॉ. विष्णू उकंडे राष्ट्रवादीतर्फे, तर सेनेने भाजपच्या माजी आमदार संदीप धुर्वे यांना दत्तक घेऊन त्यांच्या हाती धनुष्यबाण दिला आहे.
नाईक घराण्यासाठी अघोषित राखीव मतदारसंघ, अशी उभ्या महाराष्ट्रात ओळख असलेल्या पुसद मतदारसंघात राष्ट्रवादीच्या मनोहर नाईक यांच्याविरुद्ध काँग्रेसने प्रथमच राहुल ब्रिगेडच्या सचिन नाईक यांना उभे केले आहे. भाजपाचा या मतदारसंघात प्रभाव नाही, पण परिस्थिती उद्भवल्याने वसंतराव कान्हेकर यांना भाजपने लढवले आहे. शिवसेनेने राष्ट्रवादीच्या माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकरांना उमेदवारी दिली आहे. खरा सामना मनोहर नाईक विरुद्ध प्रकाश पाटील असा होण्याची चर्चा आहे. दिग्रस मतदारसंघ कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा बालेकिल्ला होता. मात्र, शिवसेनेच्या संजय राठोड यांनी असा काही उद्ध्वस्त केला की, या मतदारंसघात स्वत माणिकराव ठाकरे किंवा त्यांचे पुत्र राहुल ठाकरे किंवा काँग्रेसचे माजी मंत्री संजय देशमुख यापकी कुणीही संजय राठोड यांना टक्कर देऊ शकत नाही, असे चित्र असल्याने बंजारा उमेदवार म्हणून कांॅग्रेसने देवानंद पवार या तरुणाला भिडवले आहे. आपद धर्म म्हणून राष्ट्रवादीने प्रथमच वसंत घुईखेडकर यांना लढवले आहे, तर भाजपचे प्रा. अजय दुबे निवडणूक उपचार करीत आहे. खरी लढत सेना आणि काँग्रेस यांच्यात असल्याचे चित्र आहे. उमरखेड हा मतदारसंघ २००९ पासून अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आहे. काँग्रेसने विजय खडसे यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. मोहन मोरे प्रथमच राष्ट्रवादीतर्फे राजू नजरधने भाजपतर्फे दुसऱ्यांदा उभे आहेत. शिवसेनेने ऐनवेळी प्रथमच मुन्ना पांढरे यांना उभे केले आहे. काँग्रेस आणि भाजप, असा सरळ सामना होण्याचे संकेत आहेत.