येत्या १ जुलला होणाऱ्या २ कोटी वृक्ष लागवड मोहिमेसाठी रायगड जिल्हा सज्ज झाला आहे. या मोहिमेअंतर्गत जिलात एकाच दिवशी तब्बल साडे चार लाख वृक्षांची लागवड केली जाणार आहे. पर्यावरण संवर्धन आणि संतुलन राखण्यासाठी या उपक्रमात

जिल्ह्य़ातील नागरिक, सामाजिक संस्थांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी शितल उगले यांनी केले आहे.

वाढते औद्योगिकरण, वाहनांची वाढती संख्या, बेसुमार जंगलतोड, हवेतील प्रदुषण यामुळे पर्यावरणाचे संतुलन ढासळत चालले आहे. यामुळे ग्लोबल वॉìमगसारखी समस्या प्रकर्षांने समोर आली आहे. हवामानातील सातत्याने होणारे बदल, बदलते ऋतूचक्र हे देखील मानवाने पर्यावरणावर केलेल्या आघाताचे दुष्परिणाम आहेत. जागतिक पातळीवर या वैश्विक समस्यांना तोंड देण्यासाठी व्यापक चर्चा झडत असल्या तरी ठोस उपाययोजना होताना दिसत नाही.

राज्यात पडलेला दुष्काळ आणि ऋतुमानाचे बदलणारे चक्र लक्षात घेऊन राज्यात २ कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम राज्याच्या वनविभागाने हाती घेतला आहे. याच उपक्रमा अंतर्गत रायगड जिल्ह्य़ात १ जुलला तब्बल साडे चार लाख वृक्षांची लागवड केली जाणार आहे. यात काजु, करंज, कांचन, सिताफळ, चिंच, कडूिलब, बदाम, खैर, शिस,  जांभुळ, बहावा, बेहडा, आवळा, आंबा, हिरडा, बांबु या प्रजातींचा समावेश असणार आहे.

जिल्ह्य़ातील विविध शासकीय यंत्रणा तसेच स्वंयसेवी संस्था, सामाजिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी संस्था या उपक्रमात सहभागी होणार आहेत. यात सार्वजनिक बांधकाम, कृषि, ऊर्जा, शिक्षण, आरोग्य, सहकार, उद्योग, पर्यटन, आदिवासी विकास, सामाजिक न्याय, गृह विभाग, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, जलसंपदा, सांस्कृतिक कार्य, नगर विकास, वस्त्रोद्योग या शासकीय विभागांचा सहभाग असणार आहे. या नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने यात सहकार्य करण्याचे मान्य केले आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या ठिकठिकाणच्या रोपवाटीकांमध्ये यासाठी रोपं तयार करण्यात आली आहेत.

शासकीय कार्यालय, रुग्णालये, पोलीस स्टेशन, एस. टी. बसस्थानके, नगरपालिका, ग्रामपंचायती, सार्वजनिक ठिकाणे, समुदकिनारे, नदी आणि कालव्यांच्या किनाऱ्यावर वृक्ष लागवड केली जाणार आहे. किल्ले रायगडावर कृषी आणि महसुल विभागामार्फत वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. यासाठी जागांची निश्चिती करण्यात आली असून, वृक्ष लागवडीसाठी खड्डे खणण्यात आले आहेत. वृक्ष लागवडीवर लक्ष ठेवण्यासाठी उपग्रह तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. १ जुलला सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या कालावधीत वृक्षलागवड केली जाणार आहे. दरदोन तासांनी झालेल्या वृक्ष लागवडीचा आढावा घेतला जाणार आहे.

उपक्रमाबाबत जनजागृती व्हावी आणि लोकसहभाग वाढावा यासाठी पत्रके, बॅनर्स, जाहिराती, वृत्तपत्रांची मदत घेण्यात आली आहे. या वृक्षलागवड उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे आणि प्रत्येकाने किमान एका वृक्षाची लागवड करावी असे आवाहन जिल्हाधिकारी शितल उगले यांनी केले आहे. ज्या सामाजिक संस्थांना वृक्ष लागवडीसाठी रोपांची गरज असेल त्यांनी वनविभागाशी संपर्क साधावा असे आवाहन वनविभागाने केले आहे.