02 March 2021

News Flash

अकोल्यात करोनामुळे आणखी दोन बळी, रुग्णसंख्या १०४१

 १० दिवसांमध्ये १९ जणांचा मृत्यू; ३४ रुग्ण वाढले

संग्रहित छायाचित्र

लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : जिल्ह्यात करोनामुळे मृत्यूचे सत्र सुरूच आहे. सलग १० व्या दिवशी करोनामुळे आणखी दोघांचा बळी गेल्याची नोंद झाली. सोमवारी ३४ जणांचे करोना तपासणी अहवाल सकारात्मक आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या १०४१ झाली. आतापर्यंत ५३ जणांचे मृत्यू झाले आहेत. गत सलग १० दिवसांत १९ जणांचे मृत्यू झाल्याने अत्यंत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

अकोला जिल्ह्यात करोनाचा प्रकोप सुरूच आहे. रुग्ण वाढीसोबतच मृत्यूचे सत्रही कायम आहे. वाढत्या मृत्यूच्या प्रमाणामुळे उपचारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. शहरात ६ ते १५ जूनपर्यंत सलग १० दिवसांत करोनाबाधितांचा मृत्यू झाला. या कालावधीत तब्बल १९ जण दगावले आहेत.

विदर्भात करोनामुळे सर्वाधिक मृत्यू अकोला जिल्ह्यात झाले. मृत्यूवर अद्याापही नियंत्रण मिळवता आलेले नाही. जिल्ह्यातील एकूण १४३ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी १०९ अहवाल नकारात्मक, तर ३४ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या १०४१ झाली. सध्या रुग्णालयात ३३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, करोनामुळे आजही आणखी दोन मृत्यू वाढले आहेत. ५८ वर्षीय पुरुष रुग्णाला १२ जून रोजी दाखल करण्यात आले होते. ते शिवाजी नगर भागातील रहिवासी होते. त्यांचा १३ जून रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज त्यांचा करोना तपासणी अहवाल सकारात्मक आला आहे. आज दुपारी आणखी एका ७५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. ते फिरदोस कॉलनी येथील रहिवासी होते. त्यांना रुग्णालयात २ जून रोजी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतांना आज ते दगावले.

आज सकाळी प्राप्त अहवालात तीन रुग्ण आढळून आले. ते शिवसेना वसाहत, तारफैल, शिवाजी नगर भागातील रहिवासी आहेत. सायंकाळच्या अहवालामध्ये ३१ जणांचे अहवाल सकारात्मक आल्याने आज दिवसभरातील एकूण रुग्ण संख्या ३४ झाली. सायंकाळच्या ३१ रुग्णांमध्ये १३ महिला व १८ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये सिंधी कॅम्प येथील नऊ, बाळापूर चार, चांदूर रोड येथील तीन, खदान, जीएमसी वसाहत येथील प्रत्येकी दोन, तर आदर्श कॉलनी, डाबकी रोड, शिवाजी नगर, हिंगणा, रणपिसे नगर, रामदास पेठ, अकोट फैल, बार्शिटाकळी, शिवनी, अंबिकानगर व गंगानगर येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. करोनाबाधित आढळून आलेले परिसर तात्काळ प्रतिबंधित करून संपर्कात आलेल्यांची तपासणी केली जात आहे.
करोनातून बरे होण्याचे प्रमाण ६३.२० टक्के
अकोला जिल्ह्यात आतापर्यंत ६५८ रुग्णांची करोनावर मात केली आहे. त्याचे प्रमाण ६३.२० टक्के आहे. करोनातून ते बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यात आज दुपारनंतर रुग्णालयातून सोडण्यात आलेल्या २१ जणांचा समावेश आहे. त्यातील १६ जणांना घरी पाठवण्यात आले तर उर्वरित पाच जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले आहे.
जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण ४.९९ टक्के
जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण चांगलेच वाढत आहे. सध्या अकोला जिल्ह्यात करोनाच्या ४.९९ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला. राज्याच्या तुलनेत हे प्रमाण जास्त आहे. गत काही दिवसांपासून सलग रुग्ण दगावत असल्याने मृत्यूदर वाढला. मृत्यू रोखण्यात उपचार पद्धती निष्फळ ठरत असल्याचे चित्र आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2020 8:35 pm

Web Title: two more deaths in akola due to corona 1041 cases till today scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 यवतमाळ : एकाच दिवशी तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू; एकूण रुग्णसंख्या १८४वर
2 बुलडाणा जिल्ह्यात १२ नवे करोनाबाधित
3 करोना लढ्यात केंद्र शासनाच्या प्रभावी उपाययोजना – केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे
Just Now!
X