राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांचा विधानसभा निवडणुकीतही पाडाव करून राजकीयदृष्टय़ा संपवण्यासाठीच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांना शिवबंधनात अडकवल्यामुळे सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.
काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या विरोधातील बंडाची तलवार मंगळवारी संध्याकाळी राणे म्यान करत असतानाच सावंतवाडीत उद्धव-केसरकर युती आकाराला आली. राणे यांचे चिरंजीव व माजी खासदार नीलेश यांच्या पराभवामुळे सध्या राणे समर्थकांच्या गोटात निराशेचे वातावरण आहे. त्यातच त्यांचे बंडही फसल्यामुळे विरोधकांना आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत. मध्यंतरीच्या काळात केसरकरांप्रमाणे राणेंनीही भाजप-सेनेचे दरवाजे ठोठावल्याची चर्चा होती; पण उद्धव यांनी त्यांच्या प्रवेशाला स्पष्ट नकार देत या चर्चेला पूर्णविराम दिला. २००५ साली काँग्रेसमध्ये गेल्यानंतर राणेंनी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील शिवसेनेचे अस्तित्व पुसून टाकण्यासाठी हर प्रकारे प्रयत्न केले होते. सुरुवातीला ते त्यामध्ये काही प्रमाणात यशस्वीही झाले; पण शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्यासह स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते जिद्दीने विरोधात उभे ठाकल्यामुळे ते शक्य झाले नाही. दुसरीकडे, जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी काँग्रेस खच्ची करण्यासाठीही राणे सतत प्रयत्नशील होते. त्यामुळे गेल्या लोकसभा निवडणुकीत सावंतवाडीचे आमदार केसरकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांनी नीलेश यांच्या प्रचाराला स्पष्ट नकार दिला. तसेच पक्षश्रेष्ठींचा रोष ओढवून घेत महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांचा उघड प्रचार केला. सिंधुदुर्गात राणेंना शह देण्यासाठी प्रस्थापित नेतृत्वाच्या शोधात असलेल्या शिवसेनेला त्यातून आमदार केसरकरांसारखा मोहरा गळाला लागला. लोकसभा निवडणुकीच्या निकालाने ही ‘युती’ आणखी घट्ट झाली आणि मंगळवारी सावंतवाडीत त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले.
राणेंनी काँग्रेसमध्येच राहून आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच द्वितीय चिरंजीव नितेश यांनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा इरादा व्यक्त केला आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी या योजनेला हिरवा कंदील दाखवल्यास कुडाळ आणि कणकवली या दोन मतदारसंघांतून राणे पिता-पुत्र निवडणूक लढवतील, असा अंदाज आहे. मागील निवडणुकीत कणकवलीतून भाजपचे प्रमोद जठार यांनी निसटता विजय मिळवला. आता आमदार केसरकरांची साथ मिळाल्यामुळे त्यांचे बळ वाढेल, अशी अपेक्षा आहे. शिवसेनेतून राजकीय कारकीर्द सुरू केलेले, पण मध्यंतरीच्या काळात राष्ट्रवादीमध्ये गेलेले माजी आमदार शंकर कांबळीही मंगळवारी स्वगृही परतले. कुडाळ मतदारसंघातून सेनेकडून जिल्हाप्रमुख नाईक यांना रिंगणात उतरवण्याचे घाटत आहे. तेथे केसरकर-कांबळींची साथ उपयोगी पडेल, असा सेनेच्या नेत्यांचा होरा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत राणे यांचा पूर्ण पाडाव करण्याच्या हेतूनेच ही सर्व व्यूहरचना केली जात आहे. त्यामुळे ही निवडणूक राणेंसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.