News Flash

VIDEO: लहानपणी शाळेत न जाण्यासाठी उद्धव ठाकरे ही शक्कल लढवायचे

बाळासाहेबांबद्दलच्या खास आठवणी उद्धव यांनी सांगितल्या

बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे

सगळीकडे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ या सिनेमाची चर्चा सुरु आहे. २५ जानेवारी रोजी हा सिनेमा हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये देशभरातील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याआधी २३ जानेवारी रोजी बाळासाहेबांची ९३ वी जयंती आहे. याचनिमित्ताने २० जानेवारी रोजी कलर्स टीव्ही वाहिनीवर बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देणारा ‘मानाचा मुजरा’ या विशेष कार्यक्रम प्रदर्शित होणार आहे. या कार्यक्रमाचा टीझर कलर्स टीव्हीने फेसबुकवर शेअर केला आहे. या टीझरमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांबद्दलची एक आठवण सांगितली आहे.

प्रसिद्ध मुलाखत कार सुधीर गाडगीळ यांनी ‘मानाचा मुजरा’ या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये बाळासाहेबांबद्दलचे अनेक किस्से आणि गोष्टी उद्धव ठाकरेंनी सांगितल्या. यावेळी गाडगीळ यांनी उद्धव यांना ‘तुमच्या शाळेच्या प्रगतीपुस्तकावर खुद्द बाळासाहेब सही करत असतं की माँ साहेब?’ असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला उद्धव यांनी उत्तर देताना, ‘साहेबच सही करायचे’ असं उत्तर दिलं. पण या उत्तराबरोबरच त्यांनी लहानपणीची एक खास गोष्टही उपस्थितांबरोबर शेअर केली. शाळेत जायचे नसल्यास त्यावेळी आपण काय युक्ती करायचो याबद्दल उद्धव यांनी सांगितले. उद्धव म्हणाले, ‘ज्यावेळेला कधी शाळेला दांडी मारायची असेल त्यावेळेला सगळ्यात सोप्पा उपाय म्हणजे साहेबांना जाऊन मिठी मारुन बसायचं.’ यानंतर सभागृहात अनेकांना हसू फुटले. पुढे उद्धव म्हणाले, ‘अशी मिठी मारल्यावर ते माँ साहेबांना सांगायचे, जाऊ दे ना आता, उद्या बघू.’

या आधीही बालदिनानिमित्त ‘एबीपी माझाचा’ विशेष कार्यक्रम, ‘ऐसपैस गप्पा राजकाकांशी’ या कार्यक्रमात राज ठाकरेंनी आपल्या लहानपणीच्या अनेक गोष्टींना उजाळा दिला होता. त्यावेळी त्यांनीही चौथीनंतरच्या माझ्या प्रगतीपुस्तकावर बाळासाहेबांची सही होती असं सांगितलं होतं. ‘मानाचा मुजरा’ हा संपूर्ण कार्यक्रम रविवार दिनांक २० जानेवारीला संध्याकाळी ७ वाजता कलर्स मराठी वाहिनीवर पाहता येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2019 12:15 pm

Web Title: uddhav thackeray talks about childhood memories with balasaheb in manacha mujara of colors marathi
Next Stories
1 शिर्डीजवळ ट्रकला कारची धडक, दोन ठार; ४ जखमी
2 गिरीश बापट यांनी मंत्रीपदाचा गैरवापर केला, हायकोर्टाचे ताशेरे
3 डान्सबार सुरु झाल्याने छोटा पेंग्विन खूश असेल: नीलेश राणे
Just Now!
X