शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी ८५ किलोमीटर अनवाणी पायी जाऊन विठ्ठलाला साकडे घालणाऱ्या जतच्या दाम्पत्याला नव्या सरकारच्या शपथविधीवेळी व्यासपीठावर स्थान देण्याचे आश्वासन शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विटा दौऱ्यावेळी दिले.

जत तालुक्यातील बनाळी येथील संजय सावंत यांनी पत्नी रूपाली यांच्यासमवेत ५ दिवसाचा निरंकार उपवास करीत पंढरपूरला पायी जात राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा असे विठ्ठलाला साकडे घातले. शुक्रवारी पक्ष प्रमुख  ठाकरे हे खानापूर तालुक्यात अवकाळी पावसाने झालेल्या पीकहानीची पाहणी करण्यासाठी आले होते. या दौऱ्यामध्ये त्यांनी विटा कराड रस्त्यावर असलेल्या प्रकाश गायकवाड यांच्या द्राक्ष बागेच्या नुकसानीची पाहणी केली . त्या वेळी सावंत दाम्पत्याने ठाकरे यांची भेट घेतली.

या वेळी शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेत असताना होणाऱ्या समारंभावेळी आम्हाला कोपऱ्यात एखादी जागा मिळावी अशी विनंती सावंत यांनी ठाकरे यांच्याकडे केली. त्या वेळी, कोपऱ्यात कशाला, व्यासपीठावरच जागा देतो असे सांगत संपर्क क्रमांक आणि पत्ताही मागून घेतला.