कोपर्डी खटल्यातील आरोपीचा साक्षीदार माजी अधिकारी रवींद्र चव्हाण याने आरोपींचे निर्दोषत्व सिद्ध होईल असे पुरावे दिलेच नाही. पण माझ्यावर व्यक्तिगत आकसातून आरोप केले. त्यांनी दिलेल्या चित्रफितींची सत्यता नसल्याने तो पुरावा होऊच शकत नाही, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केला.

जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर कोपर्डी खटल्याची सुनावणी सुरू असून आज सरकार पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद संपला. मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याचे वकील योहान मकासरे यांनी आज युक्तिवादाला सुरुवात केली.

कोपर्डी खटल्यातील आरोपी संतोष भवाळ याच्या बचावाकरिता माजी अधिकारी चव्हाण याची न्यायालयात साक्ष झाली होती. त्या संदर्भात युक्तिवादात विशेष सरकारी वकील निकम म्हणाले, न्यायालयाच्या परवानगीनंतर चव्हाण यांची महिनाभराने उशिरा ही साक्ष घेण्यात आली. त्यात आरोपीचे निर्दोषत्व सिद्ध करण्यापेक्षा माझ्यावर आकसातून आरोप करण्यात आले. गुन्ह्याच्या तपास माझ्या मार्गदर्शनाखाली झाल्याचा आरोप केला. पण कोपर्डीतील तीनही आरोपींना अटक झाल्यानंतर माझी नेमणूक मुख्यमंत्र्यांनी केली. लोकांचा विश्वास असल्याने त्यांनी ही मागणी केली होती. साक्षीदाराने कोपर्डीबाबत मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषेदत केलेले भाषण, एका वृत्तवाहिनीने विनोद तावडे यांची घेतलेली मुलाखत, मराठा मोर्चाबाबत मी एका स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत, भय्युजी महाराज व माझी भेट झाल्याबाबत बचाव पक्षाने दाखल केलेल्या ध्वनिचित्रफितीत सत्यता नाही. माझ्याबद्दलच्या द्वेषातून या चित्रफिती तयार करण्यात आल्या. त्यामुळे त्या पुरावा ठरत नाही असे निकम यांनी युक्तिवादात सांगितले.

बचाव साक्षीदाराने विधानपरिषदेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची ध्वनिचित्रफीत तयार केल्याने विधानपरिषदेचा हक्क भंग होतो का, असा प्रश्न उपस्थित होतो, वाहिनींकडून त्या चित्रफिती अधिकृतरीत्या घेण्यात आलेल्या नाही. तसेच विधानपरिषदेतील कामकाजाची कागदपत्रे ही अध्यक्षांच्या परवानगीने घ्यावी लागतात. त्या संदर्भातील कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आलेली नाहीत, असेही त्यांनी सांगितले. आरोपी जितेंद्र शिंदेच्या वतीने विधिज्ञ योहान मकासरे यांनी अंतिम युक्तिवादाला सुरुवात केली. या घटनास्थळाचा तयार करण्यात आलेला नकाशा बदलण्यात आला. त्यात अनेक त्रुटी आहे, बचाव पक्षाला वेगळाच नकाशा देण्यात आला आहे. या नकाशाबाबत भूमी अभिलेख अधिकाऱ्याचा जबाब घेण्यात आलेला नाही, त्यामुळे नकाशाबाबत संशय निर्माण होतो. या गुन्ह्यातील फिर्यादी व इतर साक्षीदार हे एकमेकांचे नातेवाइक आहे. फिर्यादीने फिर्याद दाखल केल्यानंतर त्यांचे पुरवणीजबाब पोलिसांनी घेतले आहे. तर न्यायालयात फिर्यादीने वेगळीच साक्षी दिली आहे. त्यातून सरकारी पक्षाकडून पुरावे गोळा केलेले नसून, पुरावे तयार केले असल्याचा आरोप विधिज्ञ मकासरे यांनी युक्तिवादात केला. सरकार पक्षाच्या साक्षीदाराची रंगीत तालीम घेऊन न्यायालयात हजर करून साक्ष नोंदविण्यात आली असल्याचा युक्तिवाद आरोपीकडून मकासरे यांनी केला. मकासरे यांची उर्वरित साक्ष रविवारी होणार आहे.

आरोपी एक कडून उशीर नाही

आरोपींमुळे या खटल्याला उशीर होत असल्याचे सरकारी पक्षाकडून सांगण्यात येत आहे. या खटल्यात माझी विधी व सेवा प्राधिकरणाकडून नियुक्ती झाली. या खटल्यात सर्व सुनावण्यांना हजर राहिलो असून, आरोपी जितेंद्र शिंदेची बाजू मांडताना न्यायालयात सुनावणी स्थगित ठेवण्याबाबत एकही अर्ज दाखल केला नाही, असा युक्तिवाद शिंदेचे वकील योहान मकासरे यांनी केला.