नागपूर जिल्हा परिषदेचे काही कर्मचारी मागली चार महिन्यांपासून पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या ४० जवांनांच्या नावाने एक स्तृत्य उपक्रम राबवत आहेत. जिल्हा परिषदेचे हे कर्मचारी कोणत्या प्रकारच्या प्रसिद्धीची अपेक्षा न करता मागील चार महिन्यापासून नारखेड तालुक्यातील काही गावांमध्ये श्रमदानाचे काम करत आहेत. मागील चार महिन्यापासून हे कर्मचारी शनिवारी राविवारी रात्री उशीरापर्यंत दिव्यांच्या उजेडामध्ये नारखेड तालुक्यातील गावांमध्ये पाण्यासाठी पाठ तसेच चारी खणत आहेत. या कर्मचाऱ्यांनी पुलवामा येथे शहीद झालेल्या चाळीस जवांनांच्या नावाने चाळीस गावे दत्तक घेतली असून या गावामध्ये जलसंवर्धनासाठी श्रमदान करण्याची शपथ या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. शहीद जवानांना अनोख्या पद्धतीने आदरांजली देणाऱ्या या कर्मचाऱ्यांना कोणत्याही पद्धतीच्या लोकप्रियतेची अपेक्षा नसून देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांसाठी त्यांनी हे काम हाती घेतले आहे.

जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी संजय जाधव यांनी या उपक्रमाबद्दल ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ला माहिती दिली. पुलवामा हल्ल्यानंतर आपण देशासाठी काय करु शकतो यासंदर्भात आमची बैठक झाली त्यामधूनच ही कल्पना राबवण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे जाधव म्हणाले. ‘शहीद झालेले जवळजवळ सर्वच जवान हे ग्रामीण भागातील होते. त्यांच्या कुटुंबासाठी उपजिविकेचे प्राथमिक साधन हे शेतीच होते. त्यामुळेच आम्ही शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. सध्या शेतकऱ्यांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न. या प्रश्नावर उत्तर म्हणून आम्ही पावसाचे पाणी आडवून जिरवण्यासाठी काम करण्याचे निश्चित केले आणि या मोहिमेचा श्रीगणेशा झाला,’ असं जाधव यांनी सांगितले.

नागपूरमधील नारखेड तालुक्यामध्ये पाणी प्रश्न सर्वात गंभीर असल्याने याच तालुक्यातील चाळीस गावे दत्तक घेण्यात आली. त्यानंतर जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची आणि कर्मचारी संघटनेतील अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर सर्वांनी कामासाठी होकार दिल्यानंतर गावांमध्ये जाऊन काम करण्यास सुरुवात झाली. ‘प्रत्येक गावात एक जिल्हा परिषद अधिकारी असल्याने सर्वांशी समन्वय साधणे आम्हाला सोपे झाले. त्यामधून प्रभाग विकास अधिकारी, प्रभाग शिक्षण अधिकारी अशा सर्वांनीच त्यांच्या संपर्कातून या मोहिमेसाठी लागणारे साहित्य आणि इतर गरजेच्या गोष्टींची जुळवाजुळव केल्यानंतर मार्च महिन्यापासून आम्ही गावोगावी जाऊन कामाला सुरुवात केली,’ अशी माहिती जिल्हा परिषदेचे उप-कार्यकारी अधिकारी असणाऱ्या राजेंद्र भुयारे यांनी दिली. या प्रकल्पासाठी कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या खिशातून पैसे काढत लाखभराहून अधिक रक्कम गोळा केली. त्याशिवाय पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून विशेष मदतनिधी मंजूर करुन घेतला. तसेच जिल्हा परिषदेच्या काही योजनांमधील निधीही त्यांनी या कामासाठी वापरला.

४० जवान शहीद झाल्याने ४० गावे दत्तक घेतली आहेत. त्यामुळे प्रत्येक गाव एका शहीद जवानाच्या नावाने दत्तक घेण्यात आल्यानचे काम सुरु करताना त्या गावात शहीद झालेल्या जवानांपैकी एका जवानाचा फोटो असलेला बॅनर लावला जायचा आणि त्यानंतरच गावकऱ्यांना सोबत घेऊन कामाला सुरुवात व्हायची. ‘बॅनरमुळे गावकरी भावनिक दृष्ट्या त्या कमाशी जोडले जातात. गावकऱ्यांना ते काम आपलेसे वाटते,’ असे भुयार यांनी सांगितले. या मोहिमेत काम करणाऱ्या गावकऱ्यांना रोजंदारी दिली जाते तर जिल्हा परिषदेचे कर्मचारी आपले काम संभाळत श्रमदान म्हणून काम करत आहेत. ‘गावकरी रोज पाठ आणि चाऱ्या खोदण्याचे काम करतात, तर जिल्हा परिषदेचे कर्मचारी शनिवारी रविवारी या गावांमध्ये जाऊन गावकऱ्यांबरोबर खोदकाम करतात. मान्सूनचा पाऊस सुरु होण्याआधी काम पूर्ण करायचे असल्याने आम्ही रात्री बारा वाजल्यानंतरही दिव्यांच्या प्रकाशात काम करत आहोत,’ असं भुयार यांनी सांगितले. ‘दिवसा ऊन खूप असल्याने संध्याकाळनंतर काम करण्यावर आमचा भर आहे. त्यामुळेच अनेक ठिकाणी अगदी पहाटे तीन वाजेपर्यंत गावकरी आणि कर्मचारी काम करतात. गावकऱ्यांना या कमाचे महत्व ठाऊक असल्यानेच ते दिवस-रात्र काम करत असल्याचे समाधानकार चित्र पहायला मिळत आहे,’ असं भुयार सांगतात.

मार्चमध्ये सुरु केलेल्या या कामाचा पहिला टप्पा लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या आदल्या दिवशी म्हणजेच २३ मे रोजी पूर्ण झाला. आता दुसऱ्या टप्प्यातील काम पावसाळ्यात सुरु होणार आहे. ‘पाऊस पडल्यानंतर आम्ही खणलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साठेल. त्यानंतर आम्हाला पुढच्या टप्प्यातील काम करता येईल,’ असं भुयार यांनी स्पष्ट केले. ‘जोरदार पावसासाठी आम्ही वरुणराजाला प्रर्थना करत आहोत. मला आशा आहे की आमच्या प्रार्थना आणि शहीद जवान व शेतकऱ्यांच्या आशिर्वादामुळे आम्ही केलेले हे काम यशस्वी होऊन त्याचा गावांना फायदा होईल,’ असं मत जिल्हा शिक्षण अधिकारी चिन्मय वंजारी यांनी व्यक्त केले आहे.