केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्र मिळण्यातही यंदा अधिक अडचणी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रथम मागणाऱ्यास प्राधान्य या आयोगाच्या नव्या धोरणामुळे महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना दूर प्रांतातील परीक्षा केंद्र मिळण्याची भीती वाटत आहे.
महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद या तीनच ठिकाणी या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. परीक्षेचा अर्ज भरताना त्यामध्ये हवे असलेले परीक्षा केंद्र मागण्याची मुभा असते. महाराष्ट्रातील विद्यार्थी या सुविधेचा उपयोग करून राज्यातीलच परीक्षा केंद्र मागतात. प्रथम मागणाऱ्यास प्राधान्य या नव्या धोरणामुळे महाराष्ट्राहाबाहेरील विद्यार्थ्यांने महाराष्ट्रातील या तीन केंद्रापैकी कोणतेही एक केंद्र मागितले, तर त्याला प्राधान्य मिळणार आहे. त्यामुळे जो त्वरेने परीक्षा अर्ज दाखल करेल, त्यालाच हवे असलेले परीक्षा केंद्र मिळण्याची शक्यता आहे.
अभ्यासक्रमातील बदल करताना उत्तरेकडील विद्यार्थ्यांची सोय पाहण्यात आल्याचा आरोप लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी केला आहे. तेथील विद्यार्थ्यांना भाषा हा विषय अवघड जात असल्यानेच वैकल्पिक विषयांमधून प्रादेशिक भाषेचा विकल्प काढून टाकण्यात आल्याचे या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.