अमरावती, यवतमाळमध्ये आठवडाभराची तजवीज करण्याच्या प्रयत्नात नियमांचा विसर

अमरावती : शहर व जिल्ह्यात करोना मृत्यूचे प्रमाण आणि बाधितांची संख्या वाढू लागल्याने संसर्ग रोखण्यासाठी रविवारपासून कडक संचारबंदी लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. पण शनिवारी सकाळी उसळलेल्या गर्दीवर मात्र नियंत्रण आणता आले नाही. आठ दिवसांचा भाजीपाला, किराणा खरेदीसाठी सकाळी सात वाजल्यापासून तुडुंब गर्दी सर्वच भाजीबाजार, दुकानांसमोर होती. त्या ठिकाणी ना शारीरिक अंतराचे भान होते ना करोनाचा प्रसार होईल याची भीती होती. पोलीस, महापालिका प्रशासन उपाय करण्यात, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

प्रशासनाने येत्या १५ मे पर्यंत किराणा, भाजीपाला दुकाने बंद राहणार असल्याचे जाहीर केल्यानंतर शनिवारी सकाळी इतवारा परिसरात भाजी विक्रीच्या ठिकाणी गर्दी झाली होती. दस्तूरनगर, विलास नगर, गाडगेनगर, गांधी चौक तसेच इतरही अनेक भागात गर्दीच होती. भाजी व किराणा खरेदीसाठी आलेल्यांनी आपली वाहने रस्त्यावरच पार्किंग केल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसले.

इतवारा परिसरात भाजी बाजार भरलेला होता. तसेच, कॉटन मार्केट मार्गावरही काही भाजीविक्रेत्यांनी दुकाने थाटली. इतवारा येथे खुपच गर्दी होती. या ठिकाणी प्रशासनातफर्े  मात्र कोणीही गर्दी कमी करा, शारीरिक अंतर ठेवा असे सांगत नव्हते. काही सूचनांच्या घोषणाही होत नव्हत्या. तसेच चित्र दस्तूरनगर समोरही होते. अनेक भागात पोलीस ना महापालिका कर्मचारी दिसले. आठवडाभराच्या खरेदीसाठी जणू पोलिसांनी सूट दिल्यासारखे चित्र होते. चौका-चौकांमध्ये, रस्त्याकडेला मोठय़ा प्रमाणात फळे विकली जात होती. अक्षय्य तृतीयेला दुकाने बंद राहतील, त्यामुळे मातीच्या घागरी आणि इतर वस्तूंच्या खरेदीसाठी देखील लोक बाहेर पडल्याचे दिसले. भाजीपाला, किराणा खरेदीसाठी लोकांकडे एकच दिवसाचा वेळ  असल्याने गर्दी होणार हे प्रशासनाने गृहीत धरून उपाययोजना करायला हव्या होत्या. त्या न के ल्याने भाजी बाजारात अफाट गर्दी झाली. शारीरिक अंतराच्या नियमांचा लोकांना विसर पडला.

पेट्रोल पंपांसमोरही रांगा

परवानगी दिलेली वाहने वगळता सर्वसामान्यांना आठवडाभर पेट्रोल, डिझेल मिळणार नसल्याने वाहनचालकांनी पेट्रोल पंपांवर रांगा लावल्या. या ठिकाणीही करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन झाले नाही. कडक संचारबंदी लागू करायची असेल अशा परिस्थितीत आदल्या दिवशी सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत लोकांना खरेदीसाठी वेळ देणे म्हणजे आठवडाभराची कसर काढण्यासारखे आहे. हीच वेळ दिवसभर ठेवली असती तर कदाचित सकाळच्या सत्रात एवढी गर्दी झाली नसती.

दोन दिवसांत भरमसाठ गर्दी करायला लावायची आणि नंतर आठ दिवस कडक संचारबंदी लागू करायची, याला काय अर्थ आहे. या गर्दीचे दुष्परिणाम येत्या तीन ते चार दिवसांत दिसतील. असे करून प्रशासनाने चूक केलीच, अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या.

इतवारा बाजार परिसरात उसळलेली गर्दी.