गांधीवादी विचारांचे पुरस्कर्ते आणि माजी आमदार सा.रे. पाटील यांचे बुधवारी पहाटे ३.३० वाजता निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. प्रकृती अस्वस्थ्यामुळे गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर बेळगाव येथील के.एल. ई. रूग्णालयाच उपचार सुरू होते. मात्र, आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. सा. रे. पाटील तीनवेळा विधानसभेवर निवडून गेले होते.  मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना शिवसेनेच्या उल्हास पाटील यांनी पराभूत केले होते. सा. रे. पाटील यांचे पार्थिव आज सकाळी साडेनऊपर्यंत शिरोळच्या दत्त सहकारी साखर कारखान्यात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार न करता देहदान करण्यात येणार आहे. मीरजच्या मेडिकल कॉलेजमध्ये हे देहदान करण्यात येईल. 

सा. रे. पाटील यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही भाग घेतला होता. याच चळवळीद्वारे पुढे आलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे निवडणूक लढवून ते शिरोळमधून पहिल्यांदा आमदार झाले. त्यांना त्यावेळी यशवंतराव चव्हाणांसोबत काम करण्याची संधी मिळाली. सा. रे. पाटील यांनी महात्मा गांधींच्या विचारांनी प्रभावित होऊन, ग्रामस्वराज्याची संकल्पना साकारली. त्यासाठी त्यांचा कोल्हापूर जिल्ह्यात सहकारी चळवळ रूजवण्यात मोलाचा वाटा होता.