संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस उत्पादन यंदा किमान १५ ते ३० टक्के घटणार असल्याची साधार भीती शेतकरी नेत्यांनी व्यक्त केल्याने यंदाचा कापूस हंगाम संकटाचा ठरणार असल्याचे चित्र आहे. विदर्भात या वर्षी अतिवृष्टीपायी कापसाचे पीक अक्षरश: धुवून निघाले आहे. मान्सूनपासून सलग तीन महिनेपर्यंत कापसाचा पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विदर्भात जोरदार पाऊस पडला. यात कापूस, सोयाबीनची पार वाताहत झाली. पाऊस थांबला असला तरी बरेच दिवस ढगाळलेले वातावरण राहिले. त्यामुळे पिकांना पुरेसे उन्हदेखील मिळाले नाही.
कापूस पणन महासंघाचे एन.पी. हिराणी यांनी, कापूस उत्पादनात १५ टक्के घट होण्याची भीती वर्तविली. विदर्भात झालेला अतिरेकी पाऊस आणि शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे असलेला कल पाहता यंदाच्या खरीप हंगामात २३ ते २५ लाख गाठींपेक्षा जास्त कापूस उत्पादन शक्य नाही. राज्यात दरवर्षी सरासरी ७५ लाख कापूस गाठींचे उत्पादन होते. त्यापैकी ३० लाख कापूस गाठी विदर्भातील असतात. यंदा ही संख्या घटणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. अति पावसानेपिके वाहून गेली आहेत, हजारो हेक्टर जमीन खरडून गेली आहे. उन्हं पडलेले नाही त्यामुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रियादेखील संथ झाली आहे. या सर्वाचा परिणाम कापसाच्या पिकावर निश्चितच होणार आहे. कापूस उत्पादकांना ४ हजार रुपये हमी भाव जाहीर केला आहे. परंतु, खतांचे, कीटकनाशक आणि मजुरीचे वाढते खर्च पाहता किमान ६ हजार रुपये आधारभूत किंमत दिली पाहिजे, असे मत हिराणी यांनी व्यक्त केले. विदर्भ जन आंदोलन समितीचे किशोर तिवारी यांनी कापूस उत्पादन यंदा २५ टक्के ४० टक्के घटणार असल्याचे भाकित वर्तविले आहे. कापूस उत्पादक शेतकरी चारी बाजूंनी नागवला जात असून राज्यकर्ते कोणताही निर्णय घेत नाहीत. अस्मानी संकटात सापडलेले शेतकरी आत्महत्यांचा मार्ग चोखाळू लागले आहेत.