विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला असून, विद्यार्थ्यांच्या वजनाच्या १० टक्के वजन दप्तराचे असावे. या दृष्टीने शिक्षण विभागाने कार्यवाही सुरु केली आहे. ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे ओझे अधिक असेल, अशा शाळांवर कारवाई करण्याऐवजी तेथील शिक्षक, संस्था चालक यांच्यासमवेत शिक्षणाधिकारी बैठक घेऊन त्यादृष्टीने उपाय काढण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सरकार सकारात्मक असून नजीकच्या काळात आम्ही या विषयामध्ये नक्कीच यशस्वी होऊ, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी विधानसभेत व्यक्त केला.
शाळेतील मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याच्या शिफारशीची अंमलबजावणीसंदर्भात विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन सपकाळ, प्रकाश आबीटकर, संजय केळकर आदी सदस्यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली हेाती. या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना तावडे यांनी सांगितले की, दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या समितीने अहवाल सादर केला. या समितीच्या शिफारशी सरकारने स्वीकारून त्याची अंमलबजावणी सुरु केली आहे. समितीने केलेल्या पाहणीमध्ये सीबीएसई, आयसीएसई, आयजी आदी बोर्डांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे साधारणत: ८० टक्के इतके आढळून आले तर एसएससी बोर्डांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे २० टक्के इतके आढळून आले आहे. विद्यार्थ्यांच्या दप्तराची पाहणी केली असता त्यामध्ये पुस्तके आणि वही यांच्याबरोबर पाण्याची बाटली, सॅनिटायझर, शिकवणीची पुस्तके, डान्स क्लासची पुस्तके, खेळाचे साहित्य आदी गोष्टीही आढळून आल्या. ज्या विद्यार्थ्यांचे पालक नोकरी करतात अशा विद्यार्थ्यांच्या दप्तरामध्ये अशा वस्तू अधिक प्रमाणात आढळतात. त्यामुळे पालकांची मानसिकताही बदलण्याची गरज असल्याचे नमूद करून विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देण्याची आमची योजना असल्याचेही विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.