काँग्रेसचे ज्य़ेष्ठ नेते आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने विश्वजीत कदम यांना उमेदवारी दिली आहे अशी माहिती समजते आहे. विश्वजीत कदम हे पतंगराव कदम यांचे चिरंजीव आहेत. युवक काँग्रेसचे ते अध्यक्षही आहेत. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी जी पोटनिवडणूक होणार आहे त्यासाठी आता विश्वजीत कदम यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने या पोटनिवडणुकीत उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे.
विश्वजीत कदम हे पहिल्यांदाच विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. या पोटनिवडणुकीत आपला उमेदवार द्यायचा की नाही यासंदर्भातला निर्णय भाजपाने अद्याप घेतला नसल्याचे समजते आहे. २०१४ ला लोकसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यात विश्वजीत कदम यांनी पुण्यातून निवडणूक लढवली होती, मात्र भाजपाच्या अनिल शिरोळेंनी त्यांचा पराभव केला होता.
सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगाव हा पतंगराव कदम यांचा मतदार संघ होता. मात्र त्यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाल्याने या जागेवर आता त्यांचे पुत्र विश्वजीत कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ३ मे रोजी या निवडणुकीची अधिसूचना जारी होणार आहे. तर १० मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 1, 2018 5:00 am