भारतीय महसूल सेवेतील अधिकारी कट्टा सिंहाचलम यांचे मत

नागपूर : अपंग- अंध अधिकाऱ्यांना सक्षमपणे काम करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान, साहित्य उपलब्ध करून देण्याचा सरकारचा निर्णय आहे. परंतु सर्व फाईल्स डिजिटल किंवा ब्रेल लिपित राहत नाहीत. यामुळे अंध अधिकाऱ्यांना सहायकाची आश्यकता भासते, असे भारतीय महसूल सेवेतील अधिकारी कट्टा सिंहाचलम यांचे म्हणणे आहे. सिंहाचलम आंध्रप्रदेशातील आहेत. ते अंध असून त्यांनी यशस्वीपणे प्रत्यक्ष कर अकादमीत प्रशिक्षण प्राप्त केले. ते ७०व्या तुकडीचे अधिकारी आहेत. ते म्हणाले, आयआरएस होणे ही पहिले पाऊल असून अजून बराच टप्पा गाठायचा आहे, असेही ते म्हणाले.

ते राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी नागपूर येथे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या भारतीय महसूल सेवेतील ७० व्या तुकडीच्या दीक्षांत समारंभ झाल्यानंतर काही निवडक पत्रकारांशी बोलत होते.

दरम्यान, समारंभाप्रसंगी केंद्रीय अर्थ सचिव हसमुख अधिया, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे प्रशासकीय सदस्य श्री. बी.डी. विष्णोई उपस्थित होते तर राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीचे प्रधान महासंचालक डॉ. पुष्पेंद्रसिंग पुनिया, अतिरिक्त महासंचालिका लीना श्रीवास्तव, अतिरिक्त महासंचालिका नौशिन जहॉ अंसारी व अतिरिक्त महासंचालक राजीव रानडे प्रामुख्याने उपस्थित होते.

या तुकडीत एकूण १५३ अधिकाऱ्यांपैकी ४२ अधिकारी महिला असून दोन अधिकारी हे रोयाल भूटान सेवेतील अधिकारी आहेत. बहुतांश अधिकारी हे उत्तरप्रदेश राज्यातील असून त्या खालोखाल  राजस्थान व तामिळनाडूतील अधिकारी आहेत. तुकडीतील अधिकाऱ्यांचे सरासरी वय हे २८ इतके असून अभियांत्रिकी शिक्षण पाश्र्वभूमी असलेले अधिकारी सर्वात जास्त आहेत. दोन तृतीयांश अधिकाऱ्यांना यापूर्वी शासकीय नोकरी, सार्वजनिक उपक्रम व बहुराष्ट्रीय कंपनीतील नोकरीचा अनूभव आहे, अशी माहिती ७०व्या तुकडीचा प्रशिक्षण अहवाल माडताना प्रशिक्षण संचालक संजय धारिवाल यांनी दिली. राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम- अनुभूती, ‘इंडिया डे’ तसेच वार्षिक क्रीडा महोत्सव- ‘इंटॅक्स’ या सारख्या कार्यक्रमातून अधिकाऱ्यांचे व्यक्तिमत्त्व व्यापक झाले आहे. या तुकडीतील ४० अधिकाऱ्यांनी अवयवदाते म्हणून अवयदान- शिबिरात नोंदही केली असल्याचे धारीवाल यांनी सांगितले.