बोलवाडी! हे नाव उच्चारताच कुतूहल जागं होतं. स्वत:च्या मुलाला मुकेपणातून मुक्त करून ‘बोलके’ केल्यानंतर जयप्रदा  आणि योगेश भांगे या दाम्पत्याने सोलापूरच्या शेटफळ या खेडेगावात सुरू केलेला हा प्रकल्प. आपल्याला झालेला आनंद असंख्य  पीडितांच्या अंगणातही पेरावा, यासाठी त्यांनी ‘मुकेपणा निर्मूलना’चा ध्यास घेतला आहे.

जन्मत: येणाऱ्या कर्णबधिरपणामुळे पूर्ण आयुष्य मुकेपणे जगणाऱ्या बालकांना पालकांद्वारेच बोलायला शिकवणे ही ‘बोलवाडी’ची संकल्पना. महाराष्ट्राची वेगळी ओळख सांगणारा ‘व्हाइस ऑफ व्हाइसलेस अभियान’ या संस्थेचा ‘बोलवाडी प्रकल्प’ सोलापूर जिल्ह्यात शेटफळ (ता. मोहोळ) या छोट्याशा खेड्यात आकाराला आला आहे. तिथल्या जयप्रदा आणि योगेश भांगे या दाम्पत्याने आपल्या आयुष्यातील  समस्येवर मात केली आणि अशाच पीडितांसाठी ‘बोलवाडी’ प्रकल्प उभा केला.

BJP experiment, south Mumbai,
मते वाढविण्याचा भाजपचा प्रयोग
BJP experiment, south Mumbai,
मते वाढविण्याचा भाजपचा प्रयोग
english medium schools in pune advertising on social media to attract students
पुणे: इंग्रजी शाळांवर समाजमाध्यमांत जाहिराती करण्याची वेळ… नेमके झाले काय?
Barty, Sarathi
बार्टी, सारथी, महाज्योतीची स्वायत्तता धोक्यात! प्रशिक्षणासाठी आठ खासगी संस्थांची निवड होणार

स्वत:चा मुलगा प्रसून जन्मत: कर्णबधिर. तपासणीत मुलाचे व्यंग कळले तेव्हा हे दोघे रुग्णालयातच एकमेकांच्या गळ्यात पडून हमसून रडले. पुण्यात त्यांना अलका हुदलीकर आणि अरुणा सांगेकर भेटल्या. ‘तुम्ही मनावर घेतले तर बाळ नक्की बोलेल.’ असा सल्ला त्यांनी या दाम्पत्याला दिला. त्यामुळे त्यांना थोडा धीर आला. पण, गावात कु णी त्यांच्याशी नीट बोलेना. कु ण्या जन्माचे पाप म्हणून यांच्या पोटी असले मूल जन्मले! असे टोमणे सुरू होते. मग ‘बोकड-कोंबडे कापा’, ‘अमुक ठिकाणी चकरा मारा’, ‘तमुक नवस करा’, असे सल्ले दिले जाऊ लागले. मात्र, उपदेशांचे कडवट डोस रिचवत विचलित न होता दोघांनीही एका आगळ्या उद्दिष्टाकडे वाटचाल सुरू केली.

सन २००१. गावापासून पुणे २०० किलोमीटर अंतरावर. आठवड्यातून दोन वेळा तिथे जायचे. त्यासाठी पहाटे पाचला निघावे लागे. कधी उभे राहून प्रवास, तर कधी आजारपणातही.  प्रवासादरम्यान एकदा तर प्रसून नजरचुकीने हात सोडून गेला. कुणी तरी आणून दिला. पुढे त्याच्या खिशात नाव-पत्त्याची चिठ्ठी ठेवली जाई. प्रसून बोललाच पाहिजे, त्यासाठी वाट्टेल ते करू, हा एकच ध्यास बाळगून हा प्रवास असाच सुरू राहिला. ‘स्पीच थेरपी’मध्ये निष्णात असणाऱ्या अलका हुदलीकरांनी दिलेले धडे गिरवले. एक दिवस खेळताना प्रसून जोरात पडला आणि तोंडातून पहिला शब्द बाहेर पडला…आई! इतकी वर्षे याच क्षणाची प्रतीक्षा असलेले भांगे दाम्पत्य आनंदले. मग, अशाच पीडितांसाठी काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. २००५ मध्ये बोलवाडी प्रकल्पाच्या कामास सुरूवात झाली.

खेड्यात गरीब कुटुंबातील सगळ्यांनाच पुण्यात जाणे-येणे शक्य नाही म्हणून या दाम्पत्याने भेदरलेल्या पालकांना गावात राहूनच ‘स्पीच थेरपी’चे धडे द्यायला सुरुवात केली. आज पुणे-मुंबई व महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांतून पालक शेटफळ या चिमुकल्या खेडेगावाचा पत्ता विचारत येतात. अशा पालकांचा आधार बनून हे दाम्पत्य शहरापासून दूर एका छोट्या गावात मुकेपणा निर्मूलनासाठी कार्यरत आहे. गवंडीकाम, शेती- मजुरी, व्यापार करणाऱ्या अनेक पालकांनी आपल्या लेकरांना इथे बोलायला शिकवले आहे. आज प्रसून  पदवीधर झाला आहे. उत्तम बोलतो. बहिऱ्या व मुक्या लेकरांना ‘वाणीच्या’ मार्गाने नेण्यासाठी ‘बोलवाडी’च्या कामात तो सक्रिय आहे. नुकताच तो गडचिरोलीला ‘सर्च’मध्ये ‘निर्माण’च्या दहा दिवसांच्या शिबिरासाठी गेला होता. ‘सर्च’च्या स्मार्ट चाळणीतून त्याची निवड झाली होती. महाराष्ट्रातील मुकेपणा निर्मूलनासाठी ठोस, मूलभूत काम करण्याचा त्याचा मानस आहे.  राज्यात अशा बालकांसाठी जागोजागी बधिर-मूक शाळा आहेत. मग ‘बोलवाडी’ चे वेगळेपण ते काय? हा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो.  पारंपरिक शाळांतून बालकांना सांकेतिक खुणांची भाषा शिकवली जाते. ‘बोलवाडी’ या खुणांच्या भाषेच्या अगदी उलट काम करते. कर्णबधिर बालकांचा शोध घेणे आणि पालकांनीच त्यांना बोलायला शिकवणे हे ‘बोलवाडी’चे मुख्य काम आहे. त्यासाठी वेगवेगळे उपक्रमही राबवले जातात.

ताटवाटी चाचणी

‘मुकेपणा निर्मूलना’च्या ध्यासपूर्तीसाठी भांगे दाम्पत्याने ‘सोलापूर जिल्ह्यातील मुकेपणाचा अभ्यास’ हे संशोधन केले. महाराष्ट्रात दर हजारी २ कर्णबधिर बालके आहेत. ‘तुमच्या घरातली ताटवाटी तुमच्या बाळाला मुकेपणापासून वाचवू शकते’ हा मोलाचा संदेश आधी महाराष्ट्रात आणि पुढे संपूर्ण देशाला देण्यासाठी या दाम्पत्यासोबत ‘प्रिसिजन कॅमशाफ्ट लि.’ कंपनीचे यतीन व डॉ. सुहासिनी शहा हे दाम्पत्य पुढे आले आहे. ‘प्रिसिजन’च्या मदतीने व संशोधनातील उपाययोजनांनुसार तीन वर्षांच्या आतील कर्णबधिर बालकांना शासकीय यंत्रणेच्या संपर्कात आणण्यासाठी जिल्ह्यातील साडेचार हजार अंगणवाडी सेविकांना ‘बोलवाडी’च्या कार्यकर्त्यांनी ‘ताटवाटी चाचणी’ प्रशिक्षण दिले. या अंगणवाडी सेविकांनी जिल्ह्यातील तब्बल पावणेतीन लाख बालकांची ताटवाटी चाचणी घेतली. यातून सुमारे दीडशे संशयास्पद कर्णबधिर बालके आढळली. त्यांना श्रवणयंत्रे देण्यात आली असून, त्यांच्यावर ‘स्पीच थेरपी’ सुरू आहे.

राज्याचे तत्कालीन अपंग कल्याण आयुक्त डॉ. नितीन पाटील यांनी अनेकदा ‘बोलवाडी’ला भेट दिली. बोलवाडीचे काम, कमी वयातच कर्णबधिर बालक शोधण्याचा ताटवाटी चाचणीचा प्रयोग जाणून घेतला आणि ‘अर्ली इंटरवेन्शन’अंतर्गत कर्णबधिर बालकांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना तयार केली. ताटवाटी चाचणी हा ‘बोलवाडी’ने राज्याला दिलेला उत्तम प्रयोग मानला जातो.

कर्णबधिर बालकांसाठी सध्या शासनाची बधिर-मूक शाळांची रचना आहे. एका मुलाचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत शासनाचे लाखो रुपये त्यावर खर्च होतात. मात्ऱ, या बालकांच्या प्रगतीला मर्यादा येतात. ‘बोलवाडी’मध्ये फक्त दहा-बारा हजारांची श्रवणयंत्रे आणि पालकांच्या इच्छाशक्तीच्या बळावर येथे येणारी मुले हमखास बोलू लागतात. ना शासनाचे अनुदान, ना हमखास कुठला मदतीचा स्रोत. तरीही शासनाच्या अंगणवाडी यंत्रणेच्या साह्याने बालकांना शोधले जाते आणि पालकांच्या सहभागाने त्यांना बोलायला शिकवले जाते. पालक व समाजाच्या इच्छाशक्तीवर सुरू असलेला आणि बालकांना हमखास बोलायला शिकवणारा महाराष्ट्रात आणि देशात विशेष असा हा अनोखा प्रयोग आहे. पोटच्या गोळ्याला बोलायला शिकवलेल्या ‘बोलवाडी’च्या खंबीर आया व वडील हेच ‘बोलवाडी’चे पुढचे शिक्षक म्हणून उभे राहात आहेत. करोनाकाळात संस्थेची प्रत्यक्ष ‘स्पीच थेरपी’ची कामे बंद असली तरी सध्या पालकांशी ऑनलाइन संवाद साधला जातो. आपल्या बालकांना घरीच कसे बोलायला शिकवायचे, याचे मार्गदर्शन यशस्वी पालक करतात.

बोलवाडीमध्ये राज्यभरातून बालके येतात. या ठिकाणी काही काळ पालकांसोबत त्यांनी राहावे व भाषा बोलायला शिकावी ही मूळ संकल्पना आहे. सध्या १६० मुले-मुली ‘स्पीच थेरपी’साठी जोडली गेली आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी ऑनलाइन संवाद साधला जातो. या बाळांच्या सोईसाठी निवास व्यवस्था उभारणे अत्यंत गरजेचे आहे. स्वत: बोलायला शिकलेल्या बालकांना आणि पालकांना हा प्रकल्प शासनाच्या साहाय्याने देशभर पोहोचवायचा आहे. त्याआधी त्यांना स्वत:च्या पोटाचा प्रश्न सोडवावा लागेल. त्यासाठी पालकांना आणि या ठिकाणी शिकणाऱ्या बालकांना मदतीचा हात मिळाल्यास ही संस्था ‘बोलवाडी प्रकल्प’ देशभर पोहोचवू शकेल.     – एजाजहुसेन मुजावर

संस्थेपर्यंत कसे जाल?

मु. पो. शेटफळ, ता. मोहोळ, जिल्हा -सोलापूर  पिन –

४१३३२४.  सोलापूर -पुणे राष्ट्रीय महामार्गावर सोलापूरपासून ६० किलोमीटर अंतरावर ‘बोलवाडी प्रकल्प’ आहे.

व्हाइस ऑफ दी व्हाइसलेस अभियान Voice  of   The  Voiceless  Abhiyan या नावाने धनादेश  काढावा. धनादेशामागे किंवा त्याबरोबर देणगीदाराने आपले संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच भ्रमणध्वनी क्रमांक लिहावा.

संस्था ‘८०-जी’ करसवलतपात्र आहे.

ऑनलाइन देणगीसाठी

खाते क्रमांक : 0840501080088

(कॉसमॉस बँक- सोलापूर शाखा)

आयएफएससी कोड – COSB0000084

धनादेश येथे पाठवा… : एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

मुंबई कार्यालय

लोकसत्ता, संपादकीय विभाग,मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१,  ०२२-६७४४०२५०

महापे कार्यालय

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०.  ०२२-२७६३९९००

ठाणे कार्यालय    

संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे.  ०२२-२५३९९६०७

पुणे कार्यालय      

संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस,

प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे- ४११००४.  ०२०-६७२४११२५

नागपूर कार्यालय       

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ३८, अ‍ॅडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२ – २२३०४२१

दिल्ली कार्यालय       

संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा- २०१३०१. ०१२०- २०६६५१५००