सारं शिवार होरपळून निघालं आहे. ज्याच्याकडून मदतीची अपेक्षा आहे, ते सरकार तोंड फिरवत आहे. आता केवळ मोर्चा काढून भागणार नाही. आपल्या मागण्या मान्य न करणाऱ्या सरकारला वठणीवर आणण्यासाठी अजून आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. महिनाभरात सरकारने आपल्या मागण्या मान्य न केल्यास उस्मानाबाद, बीड, लातूर आणि परभणी जिल्ह्यात जनावरांसह जेल भरो आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. ३५ वर्षांनंतर रस्त्यावर उतरत शरद पवार यांनी केलेल्या आंदोलनात ते कमालीचे आक्रमक असल्याचे दिसून आले.
उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाचे पवार यांनी नेतृत्व केले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चात सहभागी झालेल्या जनसमुदायास ते मार्गदर्शन करीत होते. या वेळी विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे, माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, गणेश दुधगावकर, जीवन गोरे, विद्या चव्हाण, आमदार राणाजगजितसिंह पाटील, प्रकाश गजभिये, राहुल मोटे, शिक्षक आमदार विक्रम काळे आदी उपस्थित होते.
केंद्र आणि राज्य सरकारवर टीकेची तोफ डागत पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, यंदाचा भीषण दुष्काळ दिसत असताना राज्य सरकार कोणतेही स्पष्ट धोरण अद्याप जाहीर करीत नाही, ही चिंतेची बाब आहे. संसदेचे अधिवेशन आताच संपले. अधिवेशनात २५ दिवसांहून अधिक कालावधी सभागृह तहकूब करण्यात घालवण्यात आला. सभागृहात आम्हाला शेतकऱ्यांचे दु:ख मांडायचे होते. मात्र एरव्ही ‘भाईयों और बहनों’ असा पुळका आणणारे देशाचे पंतप्रधान सभागृहात चच्रेसाठी तर लांबच, अधिवेशनाच्या कालावधीत दर्शन देण्यासाठीही ते फिरकले नाहीत. या काळात देशातील दुष्काळग्रस्त बहीण-भावांची त्यांना आठवण आली नाही का? मोठय़ा अपेक्षेने लोकांनी सत्तेत बदल केला. नवीन सरकारची गाडी विकासाच्या रस्त्यावरून आपल्याला घेऊन जाईल, या त्यांच्या भाबडय़ा आशेला आता तडा जाऊ लागला आहे. एखाद्या गाडीला खोडकर खोंड जुंपल्यावर दुसरे काय होणार, या शब्दांत पवार त्यांनी टीकास्त्र सोडले. नसíगक संकटामुळे मराठवाडय़ातील शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे. एकटय़ा उस्मानाबाद जिल्ह्यात ८८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत आणि दुसरीकडे मात्र भगवे कपडे घालून नको त्या भलत्याच बाता मारण्यात केंद्रातील आणि राज्यातील नेते पुढाकार घेत आहेत. परिस्थितीचे गांभीर्य ध्यानात घेऊन लवकर उपाययोजना आखा. महिनाभरात आमचे दु:ख दूर केले नाही आणि मागण्यांची अंमलबजावणी झाली नाहीतर जनावरांसह उस्मानाबाद, बीड, लातूर आणि परभणीत जेल भरो आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
कागदी वाघाला सत्तेची लाचारी
राज्य सरकारमधील सत्तेचे वाटेकरी असणाऱ्यांनी चार-पाच मंत्रिपदाच्या लाचारीसाठी शेतकरी हिताचे निर्णय घेतले नाहीत. मराठवाडय़ात काही दिवसांपूर्वी सेनेच्या आमदारांनी दुष्काळ पाहणी दौरा केला. परंतु निर्णय काहीच झाला नाही. सगळीकडे दुष्काळ आहे आणि सरकारने शेतकऱ्यांसाठी मत्स्यव्यवसाय हा जोडधंदा सुरू करण्याचा हास्यास्पद निर्णय घेतला आहे. पाणीच नाहीतर मत्स्यव्यवसाय काय हवेत करायचा, असा सवाल विचारत मातोश्रीवर बसून शेतकऱ्यांच्या समस्या दिसत नसतात. कागदी वाघाने सत्तेची लाचारी पत्करली आहे. शेतकऱ्यांच्या हिताची काळजी आणि जाणीव असेल तर शेतकऱ्याच्या हिताला प्राधान्य द्या, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.