मुळा धरणातून जायकवाडी धरणासाठी रविवारी पहाटे सहा वाजता पाणी सोडण्यात आले. २५० क्युसेक्स वेगाने सोडलेले हे पाणी देव नदीतून मुळा नदीत जाणार असून, कमी वेगामुळे राहुरी तालुक्याच्या पुढे जाण्यासच त्याला दोन दिवस लागतील. निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी रविवारी दुपारी १७०० क्युसेक्सने प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. निळवंडे, भंडारदरा धरणात सध्या शिल्लक असणाऱ्या ३ टीएमसी पाण्यापैकी १ टीएमसी पाणी जायकवाडीसाठी सोडले जाणार असल्याचे समजते.
उच्च न्यायालयाच्या ४८ तासांत मुळा धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडा या आदेशाची मुदत रविवारी दुपारी १२ वाजता संपणार होती. त्यामुळे  २५० क्युसेक्स वेगाने धरणातून पाणी सोडण्यात आले. कमी वेगामुळे ते धरणाच्या दरवाजातून सोडता येणे शक्य नव्हते.
पाणी सोडण्याचा वेग कमी असला तरी मुळातच धरणातील पाणीसाठा मर्यादित असल्याने पातळी झपाटय़ाने कमी होणार असून त्यानंतर धरणात फक्त अचल साठाच शिल्लक राहणार आहे.
दरम्यान, भंडारदरा धरणातून ७६० क्युसेक्सने वीजनिर्मिती केंद्राद्वारे पाणी सोडण्यास सुरूवात झाली. हे पाणी निळवंडे धरणात जमा होत आहे.
नगरमध्ये असंतोषाची चिन्हे
पाटबंधारे विभाग पाणी सोडण्याच्या मन:स्थितीत नव्हता. जिल्हय़ात पाणी सोडल्याने असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे. नगर महापालिकेसह जिल्हय़ातील सर्वानीच धरणातून पाणी सोडण्याला विरोध होता. धरणातील पाण्याची पातळी १,७५० फुटांपेक्षा खाली गेली, तर नगर शहर पाणीपुरवठा बंद पडून सगळय़ा शहराला पाणीटंचाई सहन करावी लागणार आहे.