महाड आणि पोलादपूर मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे दुसऱ्यांदा महाड शहरात पाणी शिरले आहे. मुख्य बाजारपेठ, दस्तुरी नाका हे परिसर जलमय झाले आहेत. या मार्गांवरची वाहतूक पर्यायी मार्गांवरुन वळवण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. मुंबई गोवा महामार्गावर पहाटे तीनच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली होती. ही दरड तीन तास प्रयत्न करुन दूर करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक पुन्हा सुरु झाली आहे.

गेल्या चोवीस तासांपासून मुंबईतही अतिवृष्टी झाली आहे. मुंबईच्या तिन्ही मार्गांवरील लोकल सेवाही विस्कळीत झाली आहे. जून महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाचे आगमन होते. कोकणचा काही भाग वगळता ते झालेच नाही. आता मात्र पावसाचा कहर बरसू लागला आहे असेच म्हणावे लागेल. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे मुंबईकरांच्या २६ जुलैच्या आठवणीही ताज्या झाल्या. दरम्यान असाच पाऊस नागोठणे भागातही पडतो आहे. या ठिकाणी शहरांमधल्या सखल भागात पाणी साठलं आहे. आंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नागोठणे या ठिकाणीही पावसाचं पाणी शिरलं आहे.

अतिवृष्टीमुळे सावित्री, आंबा, कुंडलिका, उल्हास नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. तर पातळगंगा, भोगावती, काळ नद्या दुथडी भरून वाहत आहेत. सावित्री नदीने धोका पातळी ओलांडल्याने महाड शहरात मध्यरात्रीपासून पुरस्थिती निर्माण झाली. तर अंबानदीचे पाणी नागोठणे परीसरात शिरले. वाकण पाली मार्गावर पुराचे पाणी आल्याने वाहतुक विस्कळीत झाली. महाड कडून रायगड किल्लाकडे जाणारी वाहतूक बंद झाली. पोलादपुर मधील सावद, धारवली, वावे, हावरे, कालवली गावांचा संपर्क सुटला. सोलनपाडा पाझर तलाव धोकादायक परिस्थितीत आला असल्याने तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. नेरळ परीसरातील अनेक गावांत पुरसदृश्य परीस्थिती आहे. रोह्यातही पूरस्थिती निर्माण झाली आहे