सध्या कोणीही उठतो आणि राणेंवर टीका करतो. त्यात अजित पवारांची भर पडली आहे. अजित पवार आपल्याला टोपी लावून गेले. त्या माणसाबद्दल बोलायला नकोच. पहाटे शपथविधीला येणारा माणूस, आज भाजपावर टीका करतो ती आपण सहन करणार नाही. प्रसंगी बारामतीत जाऊन प्रत्युत्तर देऊ, असा इशारा भाजपाचे प्रदेश सचिव आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी दिला आहे.

भाजपाच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल राणे यांचा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अ‍ॅडव्होकेट दीपक पटवर्धन यांच्या हस्ते बुधवारी सत्कार करण्यात आला.   या प्रसंगी नीलेश म्हणाले की, चारवेळा पराभूत झाले म्हणून राणेंना अनेकजण लक्ष्य करत आहेत. त्यामध्ये अजितदादा पवारही आहेत. कोणीही उठतो आणि राणेंवर बोलतो, त्यांना आम्ही का सहन करायचे? हेच अजित पवार पहाटेला शपथविधीसाठी आले, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबतच्या आमदारांना चोरासारखे धरून शरद पवारसाहेबांसमोर उभे केले गेले. अजितदादांबरोबर आमदार टिकत नव्हते, म्हणून हात जोडून माघारी निघूनही गेले. तोच माणूस आज पूर्वीपेक्षाही जास्त आRमकपणे भाजपवर टीका करत आहे. तिकडे गेल्यावर पुन्हा उपमुख्यमंत्रिपद मिळाले. ते शांतपणे उपभोगायचे सोडून आमच्यावर कसली टीका करता? वेळ पडली तर बारामतीत जाऊन त्यांना प्रत्युत्तर  दिले जाईल. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हा घडलेल्या गोष्टींपैकी काही बाहेर काढल्या तर अजितदादांना बारामतीत तोंड वर काढता येणार नाही, असाही इशारा नीलेश यांनी दिला.