निसर्ग चक्रीवादळ आज दुपारपर्यंत पश्चिम किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांना या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या दोन राज्यातील समुद्र किनारी तसेत सखल भागात घरे असलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

करोना या संसर्गजन्य आजाराचा मुकाबला करत असतानाच एका नैसर्गिक संकटानं महाराष्ट्राच्या दारावर थाप मारली आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे मंगळवारी दुपारी चक्रीवादळात रुपांतर झाले. त्याचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात होण्याची शक्यता असून, दुपारी ते दमण आणि हरिहरेश्वरच्या दरम्यान अलिबागजवळ धडकण्याची भीती व्यक्त करण्यात आहे. यामुळे संपूर्ण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच किनारपट्टीला सतर्क राहण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, वादळाआधीच मंगळवारी रात्रीपासून किनारपट्टी भागात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.

काय नुकसान होऊ शकते

– वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे कच्ची-पक्की घरे आणि झोपडयांचे छप्पर उडून जाण्याची शक्यता आहे.

– वीजेचे खांब कोसळू शकतात. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत होण्याबरोबर संपर्क, दळणवळण प्रभावित होऊ शकते.

– सोसाटयाच्या वाऱ्यामुळे झाडाच्या फांद्या तसेच रस्त्यावरील मोठे वृक्ष उन्मळून पडू शकतात. त्यामुळे वाहतुकीला फटका बसू शकतो. फळबागांचेही नुकसान होऊ शकते.

– किनारपट्टी भागातील पीके, बांध आणि मिठागराचे नुकसान होऊ शकते.