News Flash

राजकीय सूडबुद्धीतून माझ्याविरोधात हायकोर्टात याचिका: धनंजय मुंडे

हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

(संग्रहित छायाचित्र)

अंबाजोगाईमधील पुस येथील जगमित्र शुगर मिल्ससाठी कोणत्याही संस्थानाची अथवा शासनाची जमीन कोणाचीही फसवणुक करून खरेदीखत करून घेतलेली नाही. मात्र शेतकर्‍यांना व बँकांना ५,४०० कोटी रूपयांना बुडवणार्‍या रत्नाकर गुट्टे यांच्या प्रकरणांचा पाठपुरावा केल्याने त्यांचे जावई राजाभाऊ फड यांच्याकडून राजकीय सूडबुध्दीने याचिका दाखल करण्यात आली, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. फड यांनी कोर्टाची दिशाभूल करून माझ्याविरुद्ध आदेश प्राप्त करून घेतले, असा दावाही त्यांनी केला.

सरकारी जमीन हडप केल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. या निकालाच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. सदर जमिनीची खरेदी रजिस्ट्री ऑफीस, अंबाजोगाई येथे खरेदी खताच्या आधारे करून तहसील कार्यालय, अंबाजोगाई येथे फेरफार घेण्यात आलेली आहे. ती जमीन देवस्थानची नाही, या प्रकरणी चंद्रकांत गिरी व इतरांनी अंबाजोगाई न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यामध्ये जगमित्र शुगर मिल्सच्या नावाने न्यायालयात डिक्री झालेली आहे. असे असताना चुकीच्या माहितीवरून न्यायालयाची दिशाभूल करण्यात आलेली आहे. या प्रकरणाची सर्व कागदपत्रे, कागदोपत्री पुरावे व महसूल कागदपत्रे माझ्या बाजूने आहेत. या प्रकरणी या पूर्वीच आपल्यावर अंबाजोगाई न्यायालयात दोषारोप पत्र दाखल झालेले असताना राजकीय त्रास देण्याच्या हेतूने एकाच प्रकरणामध्ये वारंवार नाव बदलून कोर्टाची दिशाभूल करून, खोटे आदेश न्यायालयाकडून प्राप्त करून घेतलेले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणातील तक्रारदार राजाभाऊ फड हे रत्नाकर गुट्टे यांचे जावई आहेत. रत्नाकर गुट्टे यांनी ५,४०० कोटी रूपयांची शेतकरी व बँकांची फसवणुक केली, या प्रकरणी आपण आवाज उठवल्यामुळेच राजकीय सूडबुध्दीतून त्यांचे जावई आपल्या विरूध्द न्यायालयात वारंवार तक्रारी करत असल्याचे मुंडे यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयातून आपल्याला नक्कीच दिलासा मिळेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

आपण जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवतो त्यामुळे जाणीवपूर्वक प्रत्येक अधिवेशनाच्या तोंडावर आपल्या विरुद्ध असे खोटे कारस्थान रचण्यात येते असा आरोपही मुंडे यांनी केला असून कितीही व्यक्तिगत हल्ले झाले तरी सरकार विरुद्ध आवाज उठवणे थांबवणार नाही आपला लढा सुरूच राहिल असे त्यांनी नमूद केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2019 2:30 pm

Web Title: will appeal in supreme court ncp leader dhananjay munde reaction on bombay high court decision
Next Stories
1 नागपुरात उभारणार रामदेवबाबा विद्यापीठ, मंत्रिमंडळाची मान्यता
2 धनंजय मुंडे अडचणीत, जमीन हडप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश
3 अहमदनगर- पुणे मार्गावर भीषण अपघात, ३ ठार
Just Now!
X