राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. तीन भाषेतील जाहिरनामा समितीचे अध्यक्ष आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जाहीर केला. जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देऊ असं आश्वासन देण्यात आलं आहे. दिलीप वळसे पाटील यांनी जाहीरनाम्यात शेतकरी, युवा, महिला हा केंद्रबिंदू असल्याचं सांगितलं आहे. आघाडी सरकारच्या काळात जे कार्य करण्यात आले त्यासंदर्भाचा समावेश या जाहिरनाम्यात करण्यात आला आहे असेही दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या राफेल खरेदी व्यवहाराने देशाच्या विवेकबुद्धीला हादरे दिले आहेत अशी टीका दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाच वर्षात राजकीय हेतूने घटनात्मक स्वायत्त संस्थांची तोडफोड करण्यात आली आहे. शेती आणि शेतकर्‍यांवर हलाखीची परिस्थिती निर्माण केली आहे. अर्थ व्यवस्थेचा मंदावलेला वेग, बेरोजगारीमध्ये प्रचंड वाढ, देशावरील कर्जात दुपटीने वाढ, परराष्ट्र धोरण भरकटले आहे. महागाई, वाढत्या किंमती, नोटबंदीच्या निर्णयाने शेतकर्‍यांची दुर्दशा झाली आहे. १४ वर्षात बेरोजगारीने निच्चांक गाठला आहे. परिणामी ४० कोटी तरुण बेकारीच्या खाईत लोटले आहेत. त्यामुळे देशातील शेतकरी प्रचंड नाऊमेद आणि निराश झाला आहे असेही दिलीप वळसे पाटील म्हणाले.

जात, संप्रदाय आणि धर्माच्या आधारे समाजात दुही माजवून स्वतः च्या लाभासाठी घेतला जात असून त्यामुळे लोकशाही संकटातून जात आहे असा आरोपही दिलीप वळसे पाटील यांनी केला. राष्ट्रवादाचा वापर लोकांमध्ये फुट पाडण्यासाठी केला जात आहे. आपले मत उघडपणे मांडणे धोकादायक ठरु लागले आहे. सरकारला त्याच्यावरील टिका सहन होत नाही आहे असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.

भाजपाने गैरवापर सुरु केल्यानेच राष्ट्रवादी व सर्व विरोधी पक्ष देशाला वाचवण्यासाठी पुढे आले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासारखे अनुभवी नेतृत्व लक्षात घेवून देशात महाआघाडी तयार झाली आहे असेही दिलीप वळसे पाटील म्हणाले. एनडीए सरकारचा सर्वच संस्थांमध्ये हस्तक्षेप होतो आहे. न्यायाधीशांना आपला व्यथा मांडाव्या लागल्या आहेत. त्यामुळे आम्ही संस्थांच्या स्थैर्याला महत्व दिले जाईल. ही अखंडता जपले जाईल असे आश्वासन देण्यात आले.

चार वर्षात कृषी क्षेत्राच्या सरासरी वार्षिक जीडीपीतील वाढ फक्त २.५ टक्के आहे. वाढीचा हा दर युपीए सरकारच्या शेवटच्या चार वर्षात ५.२ टक्के इतका मंदावला आहे. कर्जबाजारीपणा, आत्महत्यांचे वाढते प्रमाण आणि शेतमालाला पुरेशी किंमत न मिळाल्याने शेतकरी समुदायावर कुर्‍हाड कोसळली आहे. राष्ट्रवादी कृषीक्षेत्र विकासाकडे, उत्पादकता, उत्पन्न आणि बाजारपेठेची उपलब्धता वाढविण्यासाठी पुरेसे लक्ष देणार आहे. शेतीच्या शाश्वत सुधारणेला गती देण्यासाठी संरचनात्मक सुधारणा घडवून आणण्यात येईल शिवाय देशातील सर्व शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी दिले.

याशिवाय आर्थिक विकास, रोजगार निर्मिती, सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांवर भर, कामगार कायद्यात सुधारणा, कर सुधारणा, मानव संसाधन विकास, आरोग्याचा हक्क, महिला व बाल कल्याण, युवा आणि क्रीडा, ज्येष्ठ नागरीक, परराष्ट्र धोरण, नागरी विकास, ग्रामीण विकास आणि पंचायत राज, वाहतूक, पर्यावरण, सामाजिक न्याय, अल्पसंख्यांक, लोकशाही संस्थांची चौकट बळकट करताना, मनरेगा, जल आणि सिंचन विकास, उत्पन्नातील असमानता या विषयावर भर देण्यात येणार असल्याचेही दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will waive loans of farmers promise ncp in manifesto
First published on: 25-03-2019 at 17:38 IST