शेकडो घरांचे नुकसान, ८० हेक्टर शेती वाया

विरार :  चक्रीवादळाने वसई-विरार शहराला उद्ध्वस्त केले असून बुधवारी शहरात सर्वत्र विनाशाचे दृश्य दिसत होते. शहरात साडेचारशेहून अधिक झाडे ठिकठिकाणी पडली होती. वादळामुळे ५०० हून अधिक घरांची पडझड झाली आहे. ८० हेक्टर शेती वाया गेली आहे. तहसीलदारांकडून नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. वसईत एका दिवसात ३९४ मिमी पावसाची विक्रमी नोंद झाली आहे.

तौक्ते वादळाचा धोका टळला असला तरी त्याचा विध्वंस अनेकांच्या डोळ्यात पाणी मात्र ठेवून गेला आहे.  सोमवार सकाळपासूनच वादळाने रौद्र रूप धारण करत वसईत सोसाटय़ाच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरवात झाली.  मंगळवार दुपापर्यंत पाऊस सुरू होता. यामुळे शहरातील  अनेक भाग पाण्याखाली गेले तर मोठय़ा प्रमाणात झाडे पडण्याच्या घटना समोर आल्या. त्यात अनेक झाडे ही घरांवर पडल्याने घरांचे नुकसान झाले. तर अनेक बैठय़ा घरांवरचे, इमारतीवरचे पत्रे उडून गेले. किनारपट्टी भागांत तर वादळ वाऱ्याने सर्वात मोठे नुकसान केले. यात अनेकांच्या घराचे छत उडाले आहे.  अशा पद्धतीने शहरातील ५०० हून अधिक घरांची पडझड झाली आहे.

वादळाचा सर्वाधिक फटका वसईच्या बागायती शेतीला बसला आहे. वसईच्या पश्चिम पट्टीतील बहुतांश फुल आणी फळ शेतीला या वादळाचा फटका सहन करावा लागला आहे. तहसील विभागाने दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक स्वरूपातील माहितीनुसार ६० हेक्टर शेतीला वादळाचा तडाखा बसला आहे. हा आकडा ८० हेक्टर पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली आहे. यात सर्वाधिक केळींच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. तहसील विभागाकडून सध्या युद्ध पातळीवर पंचनाम्याचे काम सुरू असल्याची माहिती तहसीलदार उज्ज्वला भगत यांनी दिली आहे.

शेकडो झाडे उन्मळून पडली

वादळामुळे दोन दिवस  सतत वाहणाऱ्या सोसाटय़ाच्या वाऱ्याने शहरातील अनेक भागात झाडे उन्मळून पडण्याच्या घटना समोर आल्या आहेत. मंगळवापर्यंत शहरातील ४७० हुन अधिक झाडे पडल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली.  रविवार संध्याकाळ पासूनच शहरात वेगाने वारे वाहू लागले होते. यात सोमवार आणि मंगळवारी मुसळधार पावसाने साद घातल्याने वारा आणि पाऊस याचा सततचा होणारा मारा यामुळे अनेक ठिकाणी  छोटेमोठे वृक्ष कोलमडून पडली. रस्त्याच्या दुतर्फा पडलेल्या झाडाच्या फांद्या, खोड मंगळवारी दुपारनंतर दिसू लागली. यामुळे अग्निशमन विभागाची कसोटी लागली होती.  शहरातील अनेक मुख्य रस्त्यावर झाडे उलमडून पडली आहेत. तर अनेक इमारतीतसुद्धा झाडे पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सोसाटय़ाचा वारा आणि पाऊस यामुळे या घटना घडल्या आहेत.   शहरातील रस्त्यावर सर्वत्र दोन्ही बाजूला झाडे पडल्याने रस्ता बंद झाला होता. तर विरारमधील फुलपाडा, मनवेल  पाडा, कारगिल नगर, विजय नगर, जीवदानी पाडा, नालासोपारा येथील, आचोळे, वसईतील माणिकपूर , समता नगर, नवघर, तसेच वसईच्या पश्चिम पट्टय़ातील अनेक गावांमध्येसुद्धा मोठय़ा प्रमाणात झाडे पडली.  अनेक ठिकाणी झाडे पडून नागरिकांनी स्वत: पुढाकार घेत ही झाडे रस्त्याच्या बाजूला काढली आहेत. यामुळे या झाडांची नोंद नाही. यामुळे या वादळात सर्वाधिक नुकसान हे झाडांचे झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळाली नाही. पण काही ठिकाणी घरांचे नुकसान मात्र झाले आहे. अनेक झाडे हे वीजवाहक तारा, विजेची खांब यांच्यावर पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता.