02 June 2020

News Flash

वैद्यकीय प्रवेशाची झोनबंदी कधी उठणार?

विद्यार्थी लातुरात अन् प्रवेश पश्चिम महाराष्ट्रात

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन उसावरील झोनबंदी उठवण्याचे काम केंद्र सरकारने केल्यानंतर त्याचा लाभ ऊस उत्पादकांना झाला. गेल्या ३० वर्षांपेक्षा अधिक काळ वैद्यकीय प्रवेशासाठी देशात फक्त महाराष्ट्रात मराठवाडा, विदर्भ व उर्वरित महाराष्ट्र असे तीन विभाग असून त्या विभागातील महाविद्यालयात प्रवेश घेताना स्थानिकांना ७० टक्के व उर्वरित विद्यार्थ्यांना ३० टक्के जागा आरक्षित आहेत. या झोनबंदीमुळे गुणवंत विद्यार्थी अडचणीत येत असून शासनाने ही झोनबंदी उठवावी, अशी मागणी या क्षेत्रातील जाणकारांतून होत आहे.

मराठवाडा व विदर्भात वैद्यकीय महाविद्यालये तोकडी होती व उर्वरित महाराष्ट्रात या महाविद्यालयांची संख्या अधिक होती. मराठवाडा व विदर्भातील गुणवत्ताधारक विद्यार्थी आपल्या मेहनतीच्या बळावर राज्यातील उर्वरित वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवू लागल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील धुरिणांनी आपल्या भागाची दीर्घकालीन सोय व्हावी यासाठी वैद्यकीय प्रवेशासाठी झोनबंदी लागू केली. मराठवाडा, विदर्भ व उर्वरित महाराष्ट्र असे तीन भाग पाडण्यात आले. ज्या भागात वैद्यकीय महाविद्यालये आहेत त्या भागातील विद्यार्थ्यांना ७० टक्के जागा आरक्षित करण्यात आल्या, तर उर्वरित भागातील विद्यार्थ्यांना ३० टक्क्यांवर प्रवेश देणे सुरू झाले. यामुळे अनेक महाविद्यालयांत चांगले गुण असूनही मराठवाडा व विदर्भातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही.

मुक्त अर्थव्यवस्थेच्या जमान्यात गुणवत्तेची ही कोंडी वर्षांनुवष्रे तशीच आहे. गेल्या काही वर्षांत लातूरचे नाव गुणवत्तेसाठी घेतले जाते. खास करून वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळण्यासाठी लातूरचे नाव राज्य व देशपातळीवर आहे व ही गुणवत्ता लातूरने अबाधित ठेवली आहे. लातूरमध्ये अकरावी, बारावी विज्ञान शाखेत जेवढे विद्यार्थी शिक्षण घेतात त्यातील किमान ५० टक्के विद्यार्थी हे मराठवाडय़ाच्या बाहेरील आहेत. आपापल्या भागातील कनिष्ठ महाविद्यालयात त्यांचा प्रवेश असतो. परीक्षेच्या वेळी हे विद्यार्थी आपल्या महाविद्यालयात जातात व उर्वरित काळात ते लातूरमध्ये शिक्षण घेतात. महाविद्यालयात पटावर विद्यार्थी आहेत, मात्र प्रत्यक्षात वर्गात उपस्थिती नसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लाखापेक्षा अधिक आहे. या महाविद्यालयातील प्राध्यापकांना बिनकामी पगार मिळतो. शिक्षण विभाग या बाबीकडे लक्ष देत नाही. वास्तविक नोकरीसाठी शिक्षक, प्राध्यापकांना ज्याप्रमाणे दैनंदिन हजेरी बायोमॅट्रिक पद्धतीने सक्तीची केली जात आहे तीच पद्धत विद्यार्थ्यांनाही लागू केली पाहिजे ज्यातून विद्यार्थी वर्गात शिकतो आहे की नाही हे लक्षात येईल.

महाविद्यालयात प्रात्यक्षिक विभागासाठी कोटय़वधी रुपये खर्च केले जातात. ‘प्रयोगातून विज्ञान’ ही संकल्पना शाळेपासून सुरुवात होते, मात्र ती गेल्या अनेक वर्षांपासून दहावी, बारावीच्या शिक्षणात हरवत चालली आहे. गुणवत्ता ही केवळ उत्तरपत्रिका लिहिण्यावरून सिद्ध होते, त्यामुळे घोकंपट्टीकडे विद्यार्थ्यांचा कल वाढतो आहे व त्यालाच शिक्षकही प्राधान्य देत आहेत. लातूरने शिक्षण क्षेत्रात नाव कमावले, मात्र त्याचा भलताच लाभ अन्य मंडळी उठवत आहेत. झोनबंदी असतानाही संपूर्ण देशात सर्वाधिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी विद्यार्थी पुरवणारे महाविद्यालय म्हणून आजही लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाचे नाव घेतले जाते. या महाविद्यालयाचा विक्रम मोडण्याचे धाडस अन्य महाविद्यालयात नाही. शासनाने झोनबंदी उठवण्याचा निर्णय घेतला तर वर्षांनुवष्रे शाहू महाविद्यालयाचा विक्रम मोडणे अन्य महाविद्यालयांना जड जाणार आहे. स्पर्धा निकोप व्हावी, पारदर्शी व्हावी, सर्वाना समान न्याय दिला जावा, असे विधान अनेक जण जाहीर सभेत करतात. मात्र कृती त्या दृष्टीने होत नाही. पश्चिम महाराष्ट्रातील मंडळी आपल्या विभागाचे हित जपण्यासाठी सतत एकत्र येतात, मात्र मराठवाडा व विदर्भातील मंडळी याबाबतीत कमी पडतात. नेमका याचाच फायदा अन्य मंडळी उठवतात.

लोकांचे मूळ प्रश्नाकडून लक्ष विचलित केले जाते व मूलभूत समस्यांना तिलांजली दिली जाते. गुणवत्तेचे बावन्नकशी सोने राज्यभर पोहोचवण्यासाठी वैद्यकीय प्रवेशातील झोनबंदी उठली पाहिजे. राज्यातील नामधारी महाविद्यालयांची संख्या शोधून काढून संबंधितांवर कारवाई व्हायला हवी. राज्याच्या शिक्षण विभागाने यासाठी धाडसी पाऊल उचलण्याची गरज आहे. शिक्षण विभाग रोज नवा अध्यादेश काढण्यासाठी प्रसिद्ध आहे. यासाठी आणखीन एक त्यांनी अध्यादेश काढला तर बिघडले कुठे? असा सवाल उपस्थित होत आहे.

विद्यार्थी लातुरात अन् प्रवेश पश्चिम महाराष्ट्रात

अकरावी, बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी संख्या लातुरात आहे. महाविद्यालयाबरोबर खासगी शिकवणी वर्गही सकाळी ७ पासून रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. महाविद्यालयाच्या दैनंदिन वेळापत्रकाच्या वेळेतच खासगी शिकवण्याही सुरू असतात व तेथे विद्यार्थ्यांची संख्या भरमसाट असते. शिक्षण क्षेत्रात चुकीचे पायंडे पाडले जात आहेत. महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर लक्ष दिले पाहिजे. शिक्षण क्षेत्रातील अनिष्ट प्रथांना पायबंदी घातली गेली पाहिजे व वैद्यकीय प्रवेशातील झोनबंदी तातडीने उठवली पाहिजे, अशी प्रतिक्रिया चंद्रभानू सोनवणे महाविद्यालयाचे प्रा. संजीव सोनवणे, रिलायन्स लातूर पॅटर्नचे प्रा. उमाकांत होनराव, दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य जे. एस. दरगड यांनी व्यक्त केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 9, 2017 1:47 am

Web Title: zonal ban on medical entrance
Next Stories
1 नोटाबंदीमुळे मंदी हा निव्वळ कांगावा – चंद्रकांत पाटील
2 नोटाबंदीमुळे काळ्या पैशांचा ठावठिकाणा समजला- मुख्यमंत्री
3 दोन दिवसांच्या बाळाचे रुग्णालयातून अपहरण करणाऱ्याला अटक
Just Now!
X