अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. काही वेळापूर्वीच ही बातमी समोर आली आहे. अजित पवार यांच्या मनधरणीचे प्रयत्न गेल्या काही दिवसांपासूनच सुरु होते. आज अखेर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते हे अजित पवारांच्या भेटीला गेले होते. त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु होते.

आज सकाळी सदानंद सुळे यांनीही अजित पवार यांची भेट घेतली आणि त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. आज भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीलाही त्यांनी हजेरी लावली होती. अजित पवार यांनी आपण राष्ट्रवादीत असल्याचं जाहीर केलं होतं. तसंच त्यांना विधीमंडळ नेते म्हणूनही निवडण्यात आलं होतं. अजित पवार यांनी घेतलेला निर्णय त्यांचा वैयक्तीक आहे असं शरद पवार यांनी वारंवार सांगितलं. आजही अनेक नेत्यांनी त्यांची समजूत काढली. अखेर आज अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

शनिवारपासून काय काय घडलं?

शनिवारी सकाळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली

अजित पवार यांनी जे केलं तो त्यांचा व्यक्तीगत निर्णय हे ट्विट शरद पवार यांनी केलं

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्यावर टीका

विधीमंडळ नेतेपदावरुन अजित पवारांची हकालपट्टी करण्यात आली

अजित पवारांऐवजी जयंत पाटील यांची विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, जयंत पाटील यांनी अजित पवारांची भेट घेतली

अजित पवार यांनी ट्विट करुन आपण राष्ट्रवादीतच असल्याचं म्हटलं

रविवारीही दिवसभर अनेक कार्यकर्ते आणि नेते अजित पवारांना भेटले

अजित पवारांनी परत यावं यासाठी प्रयत्न सुरुच होते

सोमवारीही अजित पवारांना राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आणि जयंत पाटील भेटले

अजित पवार हे त्यांच्या भूमिकेवर सोमवारपर्यंत ठाम होते

मंगळवारी अजित पवार यांनी पदाचा राजीनामा दिला

महाराष्ट्रातल्या राजकारणातला हा सगळ्यात भूकंप आहे असंच म्हणावं लागेल. २३ तारखेला अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला होता. आता त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. हा भाजपाला मोठा धक्का मानला जातो आहे.