नागपूर : स्वतंत्र विदर्भाच्या मुद्दय़ांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करीत भाजपला रामराम ठोकून काँग्रेसवासी झालेले माजी आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली आहे. थोरात हे संगमनेरच्या बाहेर पडत नाही. ते संगमनेरचे प्रदेशाध्यक्ष आहेत काय, असा सवाल केला असून पाच कार्याध्यक्षांवरही टीका केली आहे.

वृत्तवाहिनीशी बोलताना आशीष देशमुख म्हणाले, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे केवळ संगमनेरचेच प्रदेशाध्यक्ष आहेत की काय, अशी चर्चा राज्यात आहे. पक्षाच्या पाच कार्याध्यक्षांची कार्यपद्धतीदेखील पक्षाला साजेशी नाही. भाजपची विचारणी ही संघाची आहे. त्यावर हेडगेवार, गोळवलकर यांच्या विचारांचा पगडा आहे. हे विचार देशाच्या किती उपयोगी आहेत, हा खरा प्रश्न आहे. काँग्रेसमध्ये सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पक्ष सोडण्याचा विचार करताय का, असे विचारले असता पक्ष सोडण्याचा आपला कुठलाही विचार नाही. मी काँग्रेसबरोबरच राहीन, असे देशमुख यांनी स्पष्ट केले. निवडणूक लढण्याबाबतचा निर्णय गुलदस्त्यात ठेवत देशमुख म्हणाले, समाजकार्य करताना निवडणूक लढवणेच गरजेचे नाही.

देशमुख यांनी चंद्रपूर आणि वर्धा लोकसभेसाठी प्रयत्न केले होते; परंतु त्यांना उमेदवारी मिळाली नाही. आता ते मतदारसंघ शोधत असल्याचे सांगण्यात येत आहे.