मुंबई : मुंबईतील दोन मतदारसंघांची अदलाबदल करून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील जागावाटप जवळपास पूर्ण झाले आहे. त्यानुसार काँग्रेस २९ व राष्ट्रवादी ७ जागा लढणार आहे.
मुंबईत विधानसभेच्या ३६ जागा आहेत. २०१४च्या विधानसभा निवडणुका काँग्रेस व राष्ट्रवादी स्वतंत्र लढले होते. तरीही फारसा आग्रह न धरता जागावाटपावर दोन्ही पक्षांत एकमत झाले. काँग्रेसने २९ जागा लढविण्याचे ठरविले असून, राष्ट्रवादीला ७ जागा सोडण्यात येणार आहेत. २०१४च्या पूर्वीच्या आघाडीत विक्रोळी व भांडूप हे दोन विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे होते. मात्र या वेळी त्यापैकी भांडूप काँग्रेसने आपल्याकडे घेतला आहे. त्याबदल्यात दुसरा मतदारसंघ राष्ट्रवादीला देण्यात येणार आहे.
गोरेगाव व दिंडोशी या मतदारसंघांचीही अदलाबदल करण्यात येणार आहे. गोरेगाव काँग्रेस, तर दिंडोशी राष्ट्रवादी लढविणार आहे. मुंबईतील किमान दोन जागा लहान पक्षांना सोडण्याचा विचार आहे, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी सांगितले.