मतदारांना सौंदर्यप्रसाधनांचे वाटप

सोलापूर : सोलापूर  शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा प्रतिनिधित्व करण्यासाठी मैदानात उतरण्याची जोरदार तयारी करणाऱ्या काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी सौंदर्यप्रसाधने (मेकअप बॉक्स) वाटप केल्याप्रकरणी निवडणूक आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी प्रशासनाला दिले आहेत.

त्यानुसार सोमवारी रात्रीच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हा गुन्हा दाखल होण्यामुळे आमदार शिंदे आणि सोलापुरात काँग्रेस आघाडी अडचणीत आली आहे.

याबाबत माकपचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल होण्याची लेखी मागणी केली होती.

गेल्या २१ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने राज्य विधानसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू केल्याच्या दिवशीच शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील काही झोपडपट्टय़ांमध्ये महिलांना सौंदर्य प्रसाधनाचे संच (मेकअप बॉक्स) वाटप केल्याची तक्रार आडम यांनी केली होती. त्यावरून जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भोसले यांनी चौकशी करताना आमदार प्रणिती शिंदे यांचेही म्हणणे घेतले. त्या वेळी आपण कौतुक म्हणून महिलांना सौेदर्यप्रसाधने वाटल्याचे स्पष्टीकरण आमदार शिंदे यांनी दिले होते.

तथापि, निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर तक्रार दाखल झाल्याने त्याची शहानिशा होण्यासाठी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले. त्यांच्या आदेशानुसार प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी पोलिसांकडे फिर्याद नोंद करण्यासाठी धाव घेतली आहे. पोलीस तपासात पुढील बाबी स्पष्ट होतील, असे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.