29 February 2020

News Flash

वेध विधानसभेचे : भाजपसमोर काँग्रेसची चौकट भेदण्याचे आव्हान

अमरावती जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात वर्चस्व असलेल्या काँग्रेसची चौकट भेदण्याचे भाजपपुढे मोठे आव्हान असेल.

(संग्रहित छायाचित्र)

मोहन अटाळकर

विदर्भात सर्वत्र यश मिळाले असताना लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघ युतीला गमवावा लागला. उमेदवाराच्या विरोधातील नाराजी आणि शिवसेनेतील अंतर्गत कुरघोडय़ांमुळे शिवसेनेचा पराभव झाल्याचे खापर भाजपने फोडले असताना शिवसेनेने पराभवाला भाजपला जबाबदार धरले. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्य़ावर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा भाजपचा प्रयत्न असला तरी युतीतील कुरघोडय़ांच्या राजकारणाचा काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी फायदा उठविण्यात कितपत यशस्वी होते यावर सारी गणिते अवलंबून आहेत. जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात वर्चस्व असलेल्या काँग्रेसची चौकट भेदण्याचे भाजपपुढे मोठे आव्हान असेल.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसने पुरस्कृत केलेल्या युवा स्वाभिमानी पक्षाच्या नवनीत कौर राणा या विजयी झाल्या. विदर्भात अमरावती आणि चंद्रपूर हे दोनच मतदारसंघ युतीला गमवावे लागले.

जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी चार ठिकाणी भाजपचा झेंडा आहे. दोन जागी अपक्ष तर दोन ठिकाणी काँग्रेस वर्चस्व टिकवून आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता आहे. जिल्हा बँक ताब्यात आहे. अनेक पंचायत समित्या व इतर संस्थांवरील पकड सैल होऊ दिलेली नाही. त्यामुळे इतरत्र जबरदस्त पडझड झालेली असताना अमरावतीत काँग्रेस-राष्ट्रवादी समर्थित खासदार असण्याने काँग्रेसचे बळ आपसूकच वाढले आहे. अशा स्थितीत भाजपला जागा तयार करण्यासाठी परिश्रम करावे लागत आहेत.

गेल्या निवडणुकीत भाजप-सेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी स्वतंत्ररीत्या लढल्याने चारही प्रमुख पक्षांना त्यांच्या मर्यादा चांगल्याच लक्षात आल्या. या वेळी युती-आघाडीचे चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असताना वंचित बहुजन आघाडीसह रिपब्लिकन पक्षाचा गवई गट, आमदार बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष किंवा आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष यांच्या महत्त्वाकांक्षा उफाळून आल्या आहेत. या लहान पक्षांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

अमरावतीतून भाजपचे आमदार डॉ. सुनील देशमुख विरुद्ध काँग्रेसचे रावसाहेब शेखावत यांच्यात पुन्हा एकदा लढत होऊ शकेल. शेखावतांनी वंचित आघाडीची साथ घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये  अनेक प्रश्नांवरील आंदोलनांमध्ये त्यांचा सहभाग वाढला आहे. लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघात राणा यांना मिळालेल्या मोठय़ा मताधिक्याने काँग्रेसच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

इच्छुकांची सर्वाधिक गर्दी बडनेरामध्ये आहे. आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा खासदार बनल्याने राणा समर्थकांना चांगलेच स्फुरण चढले आहे. भाजपमध्ये उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा आहे. जातीय मतांच्या विभागणीचा अचूक फायदा घेण्याची राणांची व्यूहनीती या वेळी यशस्वी ठरणार का, हा प्रश्न आहे.

अचलपूरमधून आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात काँग्रेसचे बबलू देशमुख यांनी या वेळी दंड थोपटले आहेत. रिपाइंचे डॉ. राजेंद्र गवई यांनीही येथून लढण्याचे जाहीर केले आहे. राज्यपातळीवर भाजपच्या विरोधात सातत्याने संघर्षांची भूमिका घेणाऱ्या बच्चू कडू यांच्यासमोर अडथळे निर्माण करण्याचा भाजपही प्रयत्न करणार आहे.

तिवसाच्या आमदार यशोमती ठाकूर यांची प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचे काँग्रेसमधील वजन वाढले आहे. त्यांच्या विरोधात भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांनी लढण्याची तयारी केली आहे. निवेदिता चौधरींसह इतरही अनेक जण इच्छुक आहेत.

डॉ. अनिल बोंडे हे कृषिमंत्री झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साह आहे. पण विरोधकांनीही शेतीचे प्रश्न घेऊन त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चालवला आहे. धामणगाव रेल्वे मतदारसंघात दीड दशकांपासून पकड कायम ठेवणाऱ्या काँग्रेसच्या वीरेंद्र जगताप यांच्या विरोधात भाजपमध्ये उमेदवारांची सर्वाधिक गर्दी आहे. विधान परिषद सदस्य अरुण अडसड यांचा गट या वेळी त्यांना कितपत शह देऊ शकतो, याची उत्सुकता आहे.

दर्यापूरमधून भाजपचे आमदार रमेश बुंदिले यांच्यासमोर या वेळी रिपाइंचे बळवंत वानखडे यांचे आव्हान असणार आहे. बुंदिले यांना अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांचाच आधार आहे. मेळघाट मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा लढत पाहायला मिळू शकते. माजी आमदार राजकुमार पटेल यांची खेळी काय राहील, याकडे अनेकांच्या नजरा आहेत.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि अनंत गुढे यांच्या गटातील संघर्ष चव्हाटय़ावर आला आहे. राष्ट्रवादीला अजूनही सूर गवसलेला नाही, अशा स्थितीत भाजपसमोर काँग्रेसची संघटनात्मक चौकट भेदून स्थान निर्माण करण्याचे तर काँग्रेससमोर अस्तित्व टिकवण्याचे आव्हान आहे.

अमरावती जिल्ह्य़ातील मतदारसंघ

१- अमरावती – भाजप

२- बडनेरा – अपक्ष

३- तिवसा – काँग्रेस

४- दर्यापूर – भाजप

५- अचलपूर – अपक्ष

६- मेळघाट – भाजप

७- धामणगाव रेल्वे – काँग्रेस

८- मोर्शी – भाजप

गतकाळातील चुका सुधारतानाच पक्षसंघटना अधिक मजबूत करण्याचे प्रयत्न भाजपने सुरू केले आहेत.

– दिनेश सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष, भाजप.

काँग्रेसने पक्षसंघटनात्मक बांधणीच्या आधारे प्रतिकूल लाटेतही आपले वर्चस्व टिकवून ठेवले आहे. सरकार सर्वच आघाडय़ांवर अपयशी ठरले आहे. या वेळी काँग्रेसलाच लोकांची पसंती राहील.

– बबलू देशमुख, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.

First Published on July 23, 2019 1:19 am

Web Title: challenge of dividing the congress frame before the bjp abn 97
Next Stories
1 #Chandrayaan2: राज ठाकरेंकडून इस्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन
2 नारायण राणेंना हॅटट्रिक चुकवायची असेल तर निवडणूक लढू नये – दीपक केसरकर
3 मुख्यमंत्रीपदाची ‘हॉट सीट’, शिवसेना-भाजपामध्ये रंगलेल्या स्पर्धेची राष्ट्रवादीने उडवली खिल्ली
X
Just Now!
X